महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .०९ मे । कर्नाटकात सोमवारी सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. बुधवार, १० मे रोजी मतदान होऊन १३ मे रोजी निकाल येतील. सन १९८९ पासून कर्नाटकात दर पाच वर्षांनी सत्तांतर झाल्याचा इतिहास आहे. सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजपने सर्व शक्ती पणाला लावली आहे. पंतप्रधानांसह डझनभर कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्री तळ ठोकून होते. याउलट काँग्रेसने राज्यात छोट्या-छोट्या सभा घेतल्या. शेवटच्या दिवशी राहुल गांधी यांनी स्कूटर आणि बसमधून प्रवास केला.
प्रचार थंडावल्यानंतर भाजपने संपूर्ण २२४ जागांचा आढावा घेत अहवाल पक्षश्रेष्ठींना सादर केला. बजरंगबली अर्थात बजरंग दल बंदीच्या मुद्द्यावर विरोधकांची मते विभागली जातील.दुसरीकडे, बंडखोरांच्या १४ जागा गमावण्याची पाळी येऊ शकते, परंतु त्याची भरपाई जुन्या म्हैसूर भागातून होईल, अशी आशा भाजपला आहे.
विजयाचे मोठे घटक…
११ लाख नवे मतदार : कर्नाटकात २२४ पैकी ११२ जागांवर पुरुषांपेक्षा महिला मतदार अधिक आहेत. २०२३ मध्ये १३ लाख महिला मतदार वाढल्या. ११ लाख नवे मतदार आहेत.
७१ शहरी जागा : ७१ जागी ३५% लोक शहरात राहतात. २०१८ मध्ये भाजपने अशा ३५ तर काँग्रेसने ३० जागा जिंकल्या होत्या.
८२ जागी दलित प्रभावी : ८२ जागी दलित संख्या २०% पेक्षा जास्त आहे. २०१३ मध्ये भाजपने ९ व २०१८ मध्ये ३१ जिंकल्या होत्या. काँग्रेसच्या जागा ४९ वरून ३४ झाल्या.
लिंगायत आणि वोक्कालिगा घटक : लिंगायत समुदायाचा प्रभाव ६७ व वोक्कालिगा यांचा ४८ जागांवर आहे.