Maharashtra Political Crisis: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल ; देवेंद्र फडणवीस निश्चिंत, म्हणाले….

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१० मे । महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून येणाऱ्या निर्णयाबाबत आम्ही आशादायी आहोत. आमच्या सरकारला काहीही होणार नाही, असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा यासह अनेक गोष्टींचे भवितव्य अवलंबून असलेला सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा निकाल येत्या काही दिवसांमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. निकाल जवळ आल्यामुळे ठाकरे गट आणि शिंदे गट यासोबत सगळ्याच राजकीय पक्षांची धाकधूक वाढली आहे. महाविकास आघाडीचे नेते ठामपणे, ‘ सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सरकार कोसळेल’, असा दावा करत आहेत. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना सकारात्मक निकाल लागण्याची आशा व्यक्त केली.

सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल देण्याआधीच अनेक राजकीय पंडितांनी आणि प्रसारमाध्यमांनी परस्पर निर्णय जाहीर करुन टाकला आहे. एवढेच नव्हे त्यावर भविष्यातील राजकीय समीकरणं आणि नव्या सरकारबाबत भाकीते केली आहेत. हा प्रकार योग्य नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची शांतपणे वाट पाहिली पाहिजे. आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत आशादायी आहोत. काहीही होणार नाही. आम्ही सगळं कायदेशीर केले आहे. त्यामुळे योग्य निर्णय येईल, ही अपेक्षा असल्याचा ठाम विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. १६ मार्च रोजी शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट यांच्यातील वादावर सुनावणी पूर्ण झाली होती. तेव्हापासून निकालाची प्रतीक्षा सगळ्यांना लागली आहे. निकालाच्या एक दिवस आधी तारीख जाहीर होते. त्यामुळे कोणत्याही क्षणी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी होऊ शकते.

सत्तासंघर्षाच्या सुनावणीला अवघे काही तास शिल्लक असताना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे शुक्रवारी दुपारी अचानकपणे राजभवनात दाखल झाले. आदित्य ठाकरे राजभवनात दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. येत्या १५ तारखेपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाकडून सत्तासंघर्षाचा निकाल येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पडद्यामागे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *