किशोर आवारे हत्याप्रकरण ; आवारे यांच्या आईच्या आरोपाने खळबळ

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१३ मे । मावळातील तळेगांव दाभाडे येथे जनसेवा विकास समितीचे किशोर आवारे यांची काल दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. तळेगाव अज्ञात हल्लेखोरांनी आवारे यांच्यावर आधी गोळ्या झाडल्या त्यानंतर धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर वार करून फरार झाले. या घटनेने फक्त तळेगावच नाही तर संपूर्ण पुणे शहर हादरून गेले आहे. या हत्येच्या निषेधार्थ तळेगाव परिसरात व्यापाऱ्यांनी उत्सफुर्त बंद पुकारला होता. या घटनेला काही तासही उलटत नाही तोच या प्रकरणाला वेगळे वळण लागलं आहे. किशोर आवारे यांच्या आईने थेट राष्ट्रवादीच्या आमदारावरच हत्येप्रकरणी आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.

आमदार सुनील शेळके, सुधाकर शेळके आणि संदीप गराडे यांनी कटकारस्थान रचून त्यांचाच साथीदार श्यामला ही हत्या करायला लावली, असा आरोप किशोर आवारे यांच्या आईने एफआयआरमध्ये केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, आमदार सुनील शेळके यांच्याकडून या आरोपांवर अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही.

दरम्यान, मावळातील तळेगांव दाभाडे येथे जनसेवा विकास समितीचे किशोर आवारे यांच्या हत्येच्या निषेधार्थ तळेगांव परिसरातील दुकाने व्यापाऱ्यांनी बंद केली होती. या हत्याकांडानंतर प्रत्येक चौकात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. संशयितांवर पोलीस वॉच ठेवून आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस सतर्क झाले आहेत. तळेगाव परिसरात सध्या तरी तणावपूर्ण शांतता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *