लडाख तणावः ड्रॅगन नरमला, शांततेद्वारे वाद सोडवण्यास सहमती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – नवीदिल्ली – विशेष प्रतिनिधी: अजय सिंग – सीमेवर आक्रमक भूमिका घेऊन वाद वाढवणाऱ्या चीनने आता नरमाईची भूमिका घेतलीय. दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांमध्ये शनिवारी चर्चा झाली. या चर्चेत चीनने सीमेवरील वाद शांततेच्या मार्गातून सोडवण्याची तयारी दर्शवली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी यासंदर्भात माहिती दिली. द्वपक्षीय करारानुसार दोन्ही देश सीमा भागातील स्थितीवर शांततेद्वारे तोडगा काढण्यावर सहमत झाले आहेत. उभय देशातील लष्कराच्या कमांडर पातळीवरील चर्चा शांततेत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात झाली, असं परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं.

परराष्ट्र मंत्रालयाकडून जारी केली माहिती

परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भात सविस्तर माहिती दिलीय. पूर्व लडाखमध्ये सुरू असलेला वाद हा शांततेद्वारे आणि द्विपक्षीय करारानुसार सोडवण्यात येईल. द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होण्यासाठी सीमा भागात शांतता आवश्यक आहे. हा वाद लवकर सोडवल्यास दोन्ही देशातील संबंध आणखी पुढे जाऊ शकतात. उभय देशातील राजनैतिक संबंधाच्या ७० व्या वर्षपूर्तीचाही यावेळी उल्लेख झाला, असं परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं.

चीनसोबत लष्करी आणि राजनैतिक पातळीवर चर्चा सुरूच राहील, असं परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं. मात्र लडाखमध्ये सीमेवर तैनात केलेले सैनिक माघारी बोलावण्याबाबत काही निर्णय झाला आहे का? यासंबंधी परराष्ट्र मंत्रालयाने काही माहिती दिली नाही. पुढच्या टप्प्यातील चर्चेत तणाव कमी करण्यावरील रुपरेषा निश्चित केली जाईल, असं सांगण्यात येतंय.

शनिवारी झाली होती लष्करी अधिकाऱ्यांची बैठक

पूर्व लडाखमधील परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी स्थानिक स्तरावर प्रयत्न करण्यात आले. मात्र त्यावर तोडगा निघाला नाही. त्यावर दोन्ही देशांकडून लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार शनिवारी पूर्व लडाखमधील चीनच्या ताब्यात असणाऱ्या माल्दो येथे ही चर्चा झाली. भारताच्या वतीने लेहस्थित १४व्या कोअरचे प्रमुख लेफ्टनंट जनरल हरिंदरसिंग यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ सहभागी झाले होते. तर, चीनच्या वतीने तिबेट लष्करी विभागाचे प्रमुख सहभागी झाले होते.

चीनच्या सैन्य उभारणीवर भारताचा आक्षेप

गलवान व्हॅली, पँगाँग त्सो आणि गोगरा या पूर्व लडाखमधील भागात परिस्थिती जैसे थे ठेवण्याचा आग्रह भारतीय शिष्टमंडळाने धरल्याचे समजते. तसेच या भागात चीनने मोठ्या प्रमाणावर सैन्य उभारणी केल्यासही भारताने आक्षेप घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *