महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१९ मे । तुळजाभवानी देवीच्या मंदिराचे पावित्र्य जपण्याच्या अनुषंगाने तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या वतीने अधिकृतपणे अंगप्रदर्शन आणि उत्तेजक कपडे घालण्यासाठी निर्बंध लागू करण्यात आले होते. याबाबतचे फलक मंदिर परिसरात लावले गेले होते. त्यानंतर अवघ्या आठ तासांत प्रशासनाने ते फलक काढत हा निर्णय मागे घेतला आहे.
तुळजाभवानी मंदिराचे पावित्र्य जपण्याच्या अनुषंगाने तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून यापूर्वी हा निर्णय झालेला. यापूर्वीच्या तहसीलदारांनी याविषयी कामकाज केलेले असून दि. १८ मे रोजी या संदर्भातील भाविकांना माहिती देणारे फलक मंदिर परिसरात लावण्यात आले होते. यामध्ये मंदिराचे पावित्र्य अबाधित राहण्यासाठी भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन यानिमित्ताने प्रशासन अधिकारी तहसीलदार सौदागर तांदळे यांनी केले होते. पण अवघ्या आठ तासांत प्रशासनाने ते फलक काढत हा निर्णय मागे घेतला आहे.
…व्यक्तीस मंदिरात प्रवेश नाही
प्रशासन कार्यालय महाद्वार आणि मंदिर परिसरात मुख्य दर्शनी जागेवर अंग प्रदर्शक, असभ्य व अशोभनीय तसेच हाफ पॅन्ट, बर्मुडा धारण केलेल्या व्यक्तीस मंदिरात प्रवेश नाही अशा आशयाचे हे फलक लावले आहेत. या निर्णयाची फलक तुळजापूर तुळजाभवानी मंदिर परिसरात लावल्यानंतर या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात आले होते. त्याचबरोबर या निर्णयावर काहींना आक्षेपही घेण्यात आला होता.