महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२० मे । कर्नाटकमध्ये शनिवारी दुपारी साडेबारा वाजता नवीन सरकारचा शपथविधी होत असून त्याची तयारी सुरू झाली आहे. शपथविधीपूर्वी काँग्रेस नेते सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांनी दिल्लीला जाऊन मंत्रिमंडळाची स्थापना आणि खातेवाटप या महत्त्वाच्या मुद्दय़ावर पक्षश्रेष्ठींशी चर्चा केली. तसेच त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचीही भेट घेतली.
गुरुवारी झालेल्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाने औपचारिकरीत्या सिद्धरामय्या यांची नेता म्हणून निवड केली. त्यानंतर त्यांनी राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा केला. राज्यपालांनी त्यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रण दिले. बंगळूरुमधील कांतीरवा मैदानात हा शपथविधी सोहळा होणार आहे. शनिवारी सिद्धरामय्या मुख्यमंत्री म्हणून, तर डी. के. शिवकुमार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. सिद्धरामय्या दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार आहेत. या वेळी काही मंत्रीही शपथ घेण्याची शक्यता आहे.
या शपथविधी सोहळय़ाकडे विरोधकांच्या ऐक्याचे प्रदर्शन आणि शक्तिप्रदर्शन म्हणूनही पाहिले जात आहे. त्यासाठी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांबरोबरच समविचारी विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीचे शरद पवार, शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती, भाकपचे डी. राजा आणि माकपचे सीताराम येचुरी, कमल हासन यांचा समावेश आहे. मात्र, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या शपथविधी सोहळय़ास जाणार नाहीत. त्याऐवजी त्या पक्षाच्या नेत्या काकोली घोष दस्तीदार यांना आपल्या प्रतिनिधी पाठवणार आहेत, अशी माहिती तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनी ट्वीट करून दिली.