रेल्वेचा अफाट वेग… एका मिनिटात अवघी कोकण रेल्वे फुल्ल कशी ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२० मे । गणेशोत्सवासाठी गावी जायचेच असा निर्धार करून हजारो चाकरमानी 3 महिनेआधीच जाण्या-येण्याचे नियोजन करत असतात. त्यासाठी रात्रभर जागून कोकण रेल्वेची कन्फर्म तिकीट मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. यंदाही तेच घडले, मात्र अवघ्या एका मिनिटात सर्व गाडय़ांची तिकिटे संपल्याने चाकरमान्यांना निराश व्हावे लागले. हे नैराश्य आता संतापापर्यंत पोहचले आहे. एका मिनिटात एका गाडीची दोन हजार तिकिटे आरक्षित होतातच कशी? असा सवाल करून या प्रकाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. रेल्वे कर्मचाऱयांचा तिकिटे आरक्षित करण्याचा वेग अचंबित करणारा आहे.

गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात मोठा सण. यंदा 19 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असून गावी जाणाऱया चाकरमान्यांनी आतापासूनच या सणाची आखणी करायला सुरुवात केली आहे. त्यात सर्वात आधी रेल्वेचे तिकीट पदरात पाडून घ्यायचे होते. 120 दिवस आधी हे आरक्षण सुरू होते. यंदा 16 मेपासून आरक्षण सुरू झाले. गेले चार दिवस चाकरमानी रेल्वेच्या आरक्षण खिडक्या गाठत आहेत. अनेकजण रात्रीपासूनच तिकीट खिडकीवर नंबर लावत आहेत. मात्र सकाळी 8 वाजता आरक्षण खिडकी उघडल्यावर पहिल्याच मिनिटाला आरक्षण फुल्ल होत असल्याने व बहुतेकांना वेटिंग तिकीट घेऊनच परतावे लागत आहे.

मी गेली अनेक वर्षे मुंबईतून कणकवली आणि कुडाळ असा प्रवास करतो आहे. मात्र गणपती असो किंवा एप्रिल-मे महिना असो रेल्वेचे कन्फर्म तिकीट मला कधीच मिळत नाही. गणपतीला गावी जायचे असल्याने आज सकाळी 8 वाजल्यापासून 16 सप्टेंबरचे तिकीट काढण्याचा प्रयत्न मी केला तर सर्वच गाडय़ांसमोर रिग्रेट हा मेसेज झळकताना दिसला. या मार्गावर इतक्या गाडय़ा धावत असताना दुसऱ्या मिनिटाला गाडय़ा फुल्ल होऊन रिग्रेट मेसेज कसा काय झळकू शकतो? यात नक्कीच काहीतरी गडबड आहे. एजंट आणि रेल्वेचे अधिकारी-कर्मचारी मिळून हा काळाबाजार करत आहेत. त्याची चौकशी व्हायला हवी, असे एका प्रवाशाने सांगितले.

जनशताब्दी, मांडवी, कोकणकन्या, मत्स्यगंधा, नेत्रावती, तुतारी, मंगला या एक्स्प्रेस गाडय़ा दररोज कोकण रेल्वे मार्गावर धावतात. त्याशिवाय तेजस (आठवडय़ातून पाच दिवस), राजधानी एक्स्प्रेस (आठवडय़ातून तीन दिवस), गोवा संपर्क क्रांती, तिरुनेलवेली, गरीब रथ, दुरंतो, केरळ संपर्क क्रांती, डबल डेकर (आठवडय़ातून दोन दिवस) मरूसागर, पूर्णा, हमसफर एक्स्प्रेस (आठवडय़ातून एक दिवस धावतात). इतक्या गाडय़ा असूनही कोकणातल्या प्रवाशांच्या नशिबी कायमची फरफट आहे. गणेशोत्सवासाठी मोठय़ा संख्येने विशेष गाडय़ा सोडल्या जातात. त्याच्या आरक्षणाचीही तीच बोंब आहे.

गणेशोत्सवाच्या बुकिंगचे पुढील वेळापत्रक
20 मे रोजी 17 सप्टेंबरचे बुकिंग होईल.
21 मे – 18 सप्टेंबर (हरितालिका तृतीया)
22 मे – 19 सप्टेंबर (गणेश चतुर्थी)
23 मे – 20 सप्टेंबर (ऋषिपंचमी)
24 मे – 21 सप्टेंबर (गौरी आगमन)
25 मे – 22 सप्टेंबर (गौरी पूजन)
26 मे – सप्टेंबर (गौरी विसर्जन)

रेल्वेकडून तिकीट आरक्षणात सुरू असलेल्या नालायकपणाचा ढळढळीत पुरावा समोर आला आहे. 18 मे रोजी एका प्रवाशाने कोकणकन्या एक्स्प्रेसची 15 सप्टेंबरची छत्रपती शिवाजी टर्मिनस ते विलवडे अशी चार तिकिटे काढली. सकाळी 8 वाजता आरक्षण सुरू होते आणि 8 वाजून 1 मिनिट 47 सेपंदांनी काढलेल्या या तिकिटाचा 1221 ते 1224 वेटिंग असा बुकिंग स्टेटस आहे. मुळात कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱया प्रमुख एक्स्प्रेस गाडय़ांची स्लिपर डब्यांची एकूण आसनक्षमता साधारण 500 इतकी असताना इतक्या वेटिंगपर्यंत तिकीट दिलेच कसे जाते, असा सवाल विचारला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *