Ticket Checker : रेल्वेमधील फुकट्या प्रवाशांवर होणार दंडात्मक कारवाई

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२१ मे । लोकल व डेमूमध्ये तिकीट न काढताच प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने लोकल, डेमूसारख्या गाड्यांमध्ये तिकीट पर्यवेक्षकांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला. आता ४० तिकीट पर्यवेक्षक वेगवेगळ्या गाड्यांमधून फिरून प्रवाशांचे तिकीट तपासतील. ज्यांच्याकडे तिकीट नसेल, अशा फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

पुणे रेल्वे स्थानकावरून दररोज सुमारे २५० प्रवासी गाड्या धावतात. तिकीट पर्यवेक्षकांची संख्या कमी असल्याने अनेकदा गाड्यांमध्ये तिकीट पर्यवेक्षकांची नेमणूक केली जात नाही. याचाच फायदा घेत अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने केवळ लोकल, डेमूमध्येच तिकीट पर्यवेक्षकांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे ते लोणावळा लोकलच्या रोज ४१ फेऱ्या होतात, तर पुणे ते दौंड दरम्यान धावणाऱ्या डेमू तसेच हडपसर ते सोलापूर दरम्यान धावणाऱ्या पॅसेंजरमध्येही तिकीट पर्यवेक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. याशिवाय, स्कॉडची देखील करडी नजर राहणार आहे.

लोकल, डेमूसह पॅसेंजर गाड्यांमध्ये तिकीट पर्यवेक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. विनातिकीट प्रवास करताना प्रवासी आढळला तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. तेव्हा प्रवाशांनी तिकीट काढूनच प्रवास करावा.

– डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *