महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २२ मे । रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या ₹ 2,000 च्या नोटा चलनातून काढल्यानंतर होणारा परिणाम कमी करण्यासाठी ₹ 1,000 च्या नोटा पुन्हा चलनात आणण्याची कोणतीही योजना नाही, असं RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज सांगितलं आणि या विषयावरील चर्चांना ‘अंदाज’ असल्याच म्हणत पूर्णविराम दिला आहे.
₹ 1,000 च्या नोटा पुन्हा चलनात आणण्याची शक्यता आहे का या प्रश्नावर विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ‘हा केवळ अंदाज आहे. सध्या असा कोणताही प्रस्ताव नाही’, असं दास यांनी स्पष्ट केलं.
नोव्हेंबर 2016 पूर्वी चलनात असलेल्या सर्व ₹ 500 आणि ₹ 1,000 च्या नोटा आठ नोव्हेंबरच्या रात्री बाद करण्यात आल्या होत्या. त्याच वेळी ₹ 2,000 ची नोट मुख्यत्वेकरून अर्थव्यवस्थेतील चलनाची गरज ‘जलदगतीने’ पूर्ण करण्यासाठी पहिल्या नोटाबंदीनंतर नोव्हेंबर 2016 मध्ये व्यवहारात आणण्यात आली होती, असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे.
‘नोटाबंदीच्या उद्दिष्टाची पूर्तता आणि इतर मूल्यांच्या बँक नोटांची पुरेशा प्रमाणात उपलब्धता झाल्यानंतर 2018-19 मध्ये ₹ 2000 च्या नोटांची छपाई थांबवण्यात आली’, असं RBI नं सांगितलं.
शक्तीकांत दास म्हणाले की, कोणीही त्यांच्या ₹ 2,000 च्या नोटा परत करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी घाई करू नये.
‘आता बँकांमध्ये गर्दी करण्याचं कोणतंही कारण नाही. तुमच्याकडे 30 सप्टेंबरपर्यंत चार महिने आहेत’, असं आरबीआय गव्हर्नर म्हणाले.
अर्थव्यवस्थेवर या निर्णयाचा परिणाम ‘अत्यंत किरकोळ’ असेल,असंही ते म्हणाले. चलनात असलेल्या एकूण चलनाच्या फक्त 10.8 टक्के ₹ 2,000 च्या नोटा असल्याचं त्यांनी सांगितलं.