पुण्यातील या मुख्य १० चौकांतील कोंडी सुटणार ? असा आहे महापालिकेचा ‘प्लॅन’

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२५ मे । शहरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत आहे. ही कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी मुख्य चौकांचे सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणानंतर शहरातील मुख्य दहा ठिकाणची कोंडी सोडवण्यासाठी महापालिकेने आता पावले उचलली आहेत. यामुळे लवकरच या कोंडीतून पुणेकरांची सुटका होण्याची चिन्हे आहेत.

शहरात वाहतूक कोंडीची समस्या तीव्र होताना दिसत आहे. अनेक चौकांत मोठी वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांब रांगा लागलेल्या दिसतात. ही कोंडी होण्यामागील नेमकी कारणे शोधण्यासाठी शहरातील ४१ चौकांचे वाहतूक पोलिसांनी सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणानंतर प्रत्येक चौकात कोंडी सोडवण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, याचा अहवालही वाहतूक पोलिसांनी महापालिकेला दिला.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे आणि इतर अधिकाऱ्यांनी शहरातील प्रमुख दहा ठिकाणांची पाहणी केली. यात त्या ठिकाणची वाहतुकीची स्थिती तपासण्यात आली. वाहतूक पोलिसांच्या सुचविलेल्या उपाययोजना आणि कोंडी सोडवण्यासाठी इतर कोणती पावले उचलावी लागतील, याचा अभ्यास करण्यात आला. यानुसार आता महापालिकेने मुख्य दहा ठिकाणची कोंडी सोडवण्यासाठी प्रत्यक्ष पावले उचलली आहेत.

कोंडी होणारी प्रमुख दहा ठिकाणे

१) पुणे विद्यापीठ चौक : रस्ता रुंदीकरण, खड्डे दुरूस्ती आणि वाहतूक पोलिसांची संख्या वाढवणार.

२) वाघोली चौक : अतिक्रमणे हटवून रस्ता रुंद करून सिग्नल यंत्रणा आणि जड वाहनांच्या वाहतुकीच्या नियमनावर भर.

३) पर्णकुटी चौक ते गुंजन चौक : रस्त्याची पुनर्रचना करून पार्किंगला मनाई आणि पथारीवाल्यांना हटवणार.

४) हडपसर गाडीतळ ते फुरसुंगी रेल्वे पूल : बस गाड्यांच्या वाहतुकीचे नियोजन, रिक्षांवर कारवाई आणि अतिक्रमणे हटवणार.

५) खडी मशिन चौक ते शत्रुंजय चौक : रस्ता रुंदीकरण करून दुभाजक बसवणार, अनेक ठिकाणी सिग्नल बसवणार.

६) कात्रज चौक : कोंढव्याकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण आणि वाहतूक पोलिसांची संख्या वाढवणार.

७) वारजे उड्डाणपूल चौक : चौकाची पुनर्रचना करून अतिक्रमणे होऊ नयेत यासाठी उपाययोजना.

८) मुंढवा चौक : रस्ता रुंदीकरण, दुभाजक बसवणे आणि पार्किगला मनाई.

९) नवले पूल ते भुमकर चौक : रस्ता रुंदीकरण, अतिक्रमणे हटवणे, ठिकठिकाणी सिग्नल बसवणे.

१०) पोरवाल रस्ता लोहगाव ते विश्रांतवाडी : पोरवाल रस्त्याला दोन्ही बाजूंनी पर्यायी मार्ग, सिग्नल बसवणे आणि अतिक्रमणे हटवणे.

 

वाहतूक कोंडी होणाऱ्या मुख्य ठिकाणी आम्ही सात ते आठ वेळा जाऊन पाहणी केली. त्यानंतर तेथील कोंडी सोडवण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील, याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार महापालिकेने कोंडी सोडवण्यासाठी काम सुरू केले आहे.- विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *