ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घ्या ; 1 थाळी घ्या, 1 फ्री मिळवा ; ऑफर पडली 90 हजार ला

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २७ मे । ऑनलाईन फसवणुकीच्या नवनवीन पद्धती समोर येत आहेत. तंत्रज्ञान जसजसे विकसित होत आहे, तसतसे ऑनलाईन फसवणुकीच्या पद्धतीही बदलत आहेत आणि वेगवेगळ्या मार्गांनी ऑनलाईन फसवणुकीची प्रकरणे समोर येत आहेत. अशीच एक ऑनलाईन फसवणुकीची घटना दिल्लीतूनही समोर आली आहे. एका नामांकित रेस्टॉरंटचे App डाऊनलोड करून महिलेला जेवणाच्या चांगल्या ऑफरचे आमिष दाखवण्यात आले. त्यानंतर तिच्या खात्यातून 90 हजार रुपये काढून घेतले.

एका न्यूज एजन्सीनुसार, हे प्रकरण 27 नोव्हेंबर 2022 चं आहे. मात्र 2 मे रोजी सायबर सेलमध्ये याबाबत रिपोर्ट नोंदवला. सविता शर्मा (40) असं पीडित महिलेचे नाव आहे. ती एक बँक ऑफिसर आहे. तिने सांगितले की, गेल्या वर्षी तिला तिच्या एका मित्राचा फोन आला होता. मित्राने फेसबुकची लिंक पाठवली आणि सांगितले की हे App डाऊनलोड केल्यास चांगल्या फूड ऑफर्स मिळतील. महिलेने ती लिंक ओपन केल्यावर तिथे कोणाचा तरी नंबर देण्यात आला. तिने त्या नंबरवर फोन केला. मात्र कोणीही फोन उचलला नाही. थोड्या वेळाने तिला दुसऱ्या नंबरवरून फोन आला.

फोन करणाऱ्याने आपण सागर रत्न रेस्टॉरंटमध्ये बोलत असल्याचे सांगितलं. महिलेला सांगण्यात आले की जर तिने App डाऊनलोड केले तर तिला एका वर एक प्लेट मोफत दिली जाईल. त्यामुळे तिने कॉलरने पाठवलेले App डाऊनलोड केले. फोन करणाऱ्याने युजर नेम आणि पासवर्डही महिलेला दिला. महिलेने App ओपन करून युजर नेम आणि पासवर्ड टाकताच तिला लगेच मेसेज आला. तिच्या खात्यातून 40 हजार रुपये डेबिट झाल्याचं आढळून आले. दोन सेकंदात दुसरा मेसेज आला, ज्यामध्ये महिलेच्या खात्यातून आणखी 50 हजार रुपये काढण्यात आल्याचे आढळून आले.

महिलेने सांगितले की, “मला आश्चर्य वाटते की मी माझे कोणतेही बँक तपशील त्या कॉलरशी शेअर केले नाहीत. असे असूनही माझ्या क्रेडिट माझ्या पेटीएममधून पैसे ट्रान्सफर झाले. त्यानंतर मी लगेच माझे क्रेडिट कार्ड ब्लॉक केले. महिलेच्या तक्रारीची नोंद घेत सायबर पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. याबाबत त्यांनी सागर रत्नच्या प्रतिनिधीला विचारणा केली असता त्यांच्याकडेही अशा अनेक तक्रारी आल्याचे समोर आले. त्याने सांगितले की, आम्ही फेसबुकवर अशा प्रकारच्या लिंक ग्राहकांना कधीच देत नाही. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अशा फसवणुकीपासून लोकांनी सावध राहण्याची गरज असल्याचे सायबर पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *