महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२ जुन । जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ विराट कोहलीला घेरण्याची रणनिती आखताहेत, यात तीळमात्र शंका नाही. मात्र विराटप्रमाणे चेतेश्वर पुजारा हा ऑस्ट्रेलियासाठी घातक ठरू शकतो. त्याने याआधीही ऑस्ट्रेलियाला अनेकदा जेरीस आणले आहे. त्यामुळे या अंतिम सामन्यात जर ऑस्ट्रेलियाला वर्चस्व राखायचे असेल तर विराटप्रमाणे चेतेश्वर पुजारापासूनही सावध रहावे, असा सल्ला ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉण्टिंगने दिला आहे.
आयपीएलची धामधुम संपल्यानंतर अवघ्या क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे ते 7 जूनपासून सुरू होणाऱ्या डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्याकडे. कसोटी क्रिकेटची मानाची गदा पटकावण्यासाठी 7 जूनपासून हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया लंडनच्या ओव्हलवर भिडणार आहेत.
पुजाराने ऑस्ट्रेलियाला यापूर्वीही अनेकदा त्रस्त केलेले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुजाराची कामगिरी उत्तम आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या घरच्या मैदानावरदेखील तुफान फलंदाजी केली आहे. पुजारा जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी चांगलाच फॉर्मात परतला आहे. पुजाराने काQटी क्रिकेटमध्ये खेळताना 6 सामन्यांतील 8 डावांमध्ये 3 शतके झळकावली आहेत. त्याचा चांगला फॉर्म पाहता ऑस्ट्रेलियन संघाने विराटप्रमाणे पुजारापासूनही सावध रहावे. त्याला लवकरात लवकर बाद करावे, असा सल्लाही पॉण्टिंगने दिला आहे.