आळंदीत बुधवारपासून वाहनांना प्रवेशबंदी; या पर्यायी मार्गाचा करा वापर

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ जुन । संत श्री ज्ञानेश्वर महाराज आषाढी पायी वारी पालखी प्रस्थान सोहळा रविवारी (दि. 11) रोजी होणार असून, त्याकरिता बुधवार, दि. 7 ते सोमवार, दि. 12 जून या कालावधीत आळंदी शहरात पोलिस प्रशासनाने वाहनांना प्रवेशबंदी घातली आहे. केवळ दिंड्याच्या, पासधारक वाहनांनाच शहरात प्रवेश दिला जाणार आहे, अशी माहिती आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील गोडसे यांनी दिली.

माउलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी शहरात बुधवार, दि. 7 जूनपासून वारकरी व दिंड्या दाखल होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात वाहतूक कोंडी होऊ नये याकरिता दरवर्षीप्रमाणे वारीकाळात वाहनांना पोलिसांकडून शहरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. सोमवार, दि. 12 जूनपर्यंत ही बंदी असणार आहे.

या काळात वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे. वाहनचालकांना पर्यायी मार्ग म्हणून शिक्रापूर महामार्गमार्गे चाकण, वडगाव घेनंद, कोयाळी, मरकळ असा व नगर महामार्गमार्गे लोणीकंद फाटा, तुळापूर, मरकळ, आळंदी व चर्‍होली बुद्रुक फाटा ते चर्‍होली खुर्द अशा जोडरस्त्याचा वापर करता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *