महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ जुन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवार (ता.७) रात्रीपासून नाॅट रिचेबल आहेत. तीन दिवस ते मुंबईबाहेर असून नेमके कुठे गेले याची माहिती मात्र गोपनीय ठेवण्यात आली आहे. दिल्लीहून परतल्यानंतर ते नाराज असल्याचे सांगितले जाते. सरकारची वर्षपूर्ती काही दिवसांवर असताना तसेच राज्यात दंगलीचे लोण पसरलेले असताना मुख्यमंत्री अचानक कुठे गेले, असा प्रश्न विचारला जात आहे.
दर बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत असते. या आठवड्यात मात्र ती झाली नाही. बुधवारी दिवसभर मुंबईतच विविध कार्यक्रमांनी शिंदेंनी हजेरी लावली. बालाजी मंदिराची भूमिपूजन केले. नवी मुंबई विमानतळ कामाची पाहणी केली. ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी रात्री संभाजीनगरच्या काही नगरसेवकांचे पक्षप्रवेशही झाले. त्यानंतर मात्र शिंदे कुठे गेलेत याची माहिती गुप्त ठेवली आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, मुख्यमंत्री सातारा जिल्ह्यातील त्यांच्या दरे गावी जाणार होते. मात्र भाजपकडून त्यांना काश्मीरला जाण्याचा सल्ला देण्यात आला. त्यामुळे तीन दिवस कुटुंबासह शिंदे मुंबईत असणार नाहीत, अशी माहिती आहे.
आश्चर्य म्हणजे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांचे दिवसभराचे कार्यक्रम माध्यम प्रतिनिधींना आदल्या रात्रीच दिले जातात. बुधवारपासून मात्र दोघांचेही कार्यक्रम कार्यालयांनी दिलेले नाहीत. याविषयी सीएम, डीसीएम कार्यालयाकडे चौकशी केला असता ‘कार्यक्रम नाहीत’ इतकेच सांगण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या नागपुरात स्वगृही आहेत.
दिल्लीहून परतल्यानंतर ‘मूड ऑफ’ झाल्याची चर्चा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागच्या आठवड्यात दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटले. मंत्रिमंडळ विस्ताराची शिंदेंची मागणी शाह यांनी मान्य केली नसल्याचे सांगितले जाते. तेव्हापासून शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे. ३० जून रोजी शिंदे सरकारची वर्षपूर्ती आहे. वर्षपूर्तीला अवघे २० दिवस बाकी असतानाही सरकारी पातळीवर अद्याप काही तयारी दिसत नाही.
जनसंपर्कप्रमुख म्हणतात, साहेब कुठे गेले माहीत नाही
मुख्यमंत्री कार्यालयास याबाबत विचारणा केली असता, ‘साहेब कुठे आहेत माहिती नाही’’ असे सांगण्यात आले. मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक व जनसंपर्क प्रमुख यांना विचारले असता ‘साहेब तीन दिवस मुंबईबाहेर आहेत, मात्र कुठे आहेत याची माहिती नाही, असे सांगितले गेले. उन्हाळ्यात अनेक राजकीय नेते परदेशात जातात. मात्र मुख्यमंत्र्यांचा दौरा गुप्त का, असा प्रश्न विचारला जातो आहे.