महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० जुन । संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पुण्यात सोमवारी (ता. १२) आगमन होत आहे. सहभागी वारकऱ्यांच्या स्वागतासाठी महापालिकेने जय्यत तयारी केली आहे. ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आळंदी रस्त्यावरील येरवडा क्षेत्रीय कार्यालयातर्फे कळस येथे सकाळी ११.३० वाजता स्वागत होईल. तुकाराम महाराज पालखीचे बोपोडी येथे दुपारी एक वाजता स्वागत केले जाईल. या दोन्ही ठिकाणी आयुक्त विक्रमकुमार यांच्या हस्ते स्वागत होईल.
दोन्ही पालख्या सोमवारी आणि मंगळवारी पुण्यात मुक्कामी असतील. बुधवारी सकाळी पालख्यांचे प्रस्थान होईल. दोन दिवस लाखो वारकरी पुण्यात मुक्कामी असताना त्यांचा निवास, आरोग्याची काळजी घेतली जाईल. या काळात शहर स्वच्छ असावे यासाठी पथके तैनात केली आहेत.
शाळांमध्ये मुक्कामी असणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी स्वच्छतागृहाची सोय आहे. सॅनिटरी नॅपकिन व्हेडींग मशीनही लावण्यात आली आहेत. निवडुंगा विठोबा मंदिर आणि पालखी विठोबा मंदिर या दोन ठिकाणी स्वतंत्र महिला कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. तेथे स्त्रीरोग तज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट असतील. या भागात मोकाट जनावरे आणि भटक्या कुत्र्यांचा वारकऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी आरोग्य विभाग घेणार आहे.
पालखी सोहळ्यामुळे १२ ते १३ जून या तीन दिवसाच्या कालावधीत महापालिकेचे सर्व दवाखाने, रुग्णालय, नर्सिंग होम येथे नोंदणीशुल्क माफ करण्यात आले आहे. सर्वांना मोफत उपचार दिले जातील. भवानी पेठेतील सोनवणे रुग्णालयासह इतर दवाखाने २४ तास खुले असतील. शहरात पालखी मार्गावर २० ठिकाणी महापालिकेच्या मांडवात आरोग्यपथक असेल. त्यांच्याकडे औषधांसह ओआरएसची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर ९० जणांचे, तर तुकाराम महाराज पालखीमार्गावर ८६ जणांचे वैद्यकीय पथक असेल.