महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ जुन । भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी स्पर्धेत विजेतेपद मिळवून एक दशक उलटले आहे. टीम इंडियाने अखेरची चॅम्पियन्स ट्रॉफी २०१३मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकली होती. तेव्हापासून भारतीय संघ अनेकवेळा आयसीसी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे पण एकदाही चॅम्पियन बनू शकला नाही. अशा परिस्थितीत टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांचेही मत आहे की, “आयसीसी ट्रॉफी जिंकणे हा लहान मुलांचा खेळ नसून महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली हे खूप सोपे वाटते.”
लंडनमधील ओव्हल क्रिकेट मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सामन्यादरम्यान रवी शास्त्री यांनी हे वक्तव्य केले. त्यानंतर रवी शास्त्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी२० वर्ल्ड कप (२००७), वन डे वर्ल्ड कप (२०११) आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. याशिवाय धोनीच्या नेतृत्वाखाली संघ कसोटी क्रमवारीतही अव्वल स्थानी आहे.
धोनीनंतर विराट कोहलीने दीर्घकाळ टीम इंडियाची कमान सांभाळली असली तरी आयसीसी ट्रॉफीमध्ये टीम इंडियाला कोणतेही मोठे यश मिळवता आले नाही. त्याचवेळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताला आयसीसीच्या बाद फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले.