महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ जुन । कोरोना लसीकरणासाठी वापरण्यात आलेल्या केंद्राच्या कोविन अॅपमधून सुमारे १०० कोटी लोकांची खासगी माहिती ‘टेलिग्राम’वर लीक झाल्याने खळबळ उडाली. टेलिग्रामच्या ऑटोमेटेड अकाउंटवर (बॉट) लस घेणाऱ्या व्यक्तीचा मोबाइल क्रमांक टाकल्यावर आधार, पासपोर्ट, पॅनकार्ड, जन्मतारीख व लसीकरण केंद्राची माहिती दिसू लागली आहे. एका मोबाइल क्रमांकावरून कुटुंबातील इतर व्यक्तींचेही लसीकरण झाले असल्यास त्यांचीही माहिती दिसू लागली आहे. सोमवारी सर्वात आधी तृणमूल काँग्रेसचे नेते संकेत गोखले यांनी सोशल मीडियावर लीक झाल्याचे स्क्रीन शॉट शेअर केले.
पी. चिदंबरम, डेरेक आे ब्रायन, जयराम रमेश यासारख्या व्हीआयपींची खासगी माहिती जाहीर झाली आहे. लीक झाल्याची बातमी पसरल्यानंतर बॉट अकाउंट गूढरीत्या बंद झाले. त्यातच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने डेटा लीकचा दावा बिनबुडाचा असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (सर्ट-इन) याची चौकशी करेल, असे स्पष्ट केले. अॅपची पडताळणी सुरू झाली .
आयटी मंत्री म्हणाले- चोरी झालेल्या डेटाद्वारे बॉट अकाउंटने घेतली माहिती माहिती-तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले, बॉट अकाउंटने डेटा चोरी करणाऱ्याच्या डेटाबेसमधून माहिती मिळवली. त्यावरून आधी चोरी झालेल्या डेटातून घेतल्याचे दिसून येते. कोविन अॅपला सुरुंग लावून माहिती चोरण्यात आली.
माहिती फुटल्याने सायबर फसवणुकीचा धोकाही वाढेल
संवेदनशील डेटा लीक झाला. जन्मतारीख, आधार, मोबाइल क्रमांक, पासपोर्ट क्रमांक, रुग्णालयाचे नाव अशी माहिती असलेल्या आधारवर सायबर गुन्हेगार फोनवरून संपर्क साधून विश्वास निर्माण करू शकतात. नंतर या माहितीचा वापर फसवणुकीसाठी करू शकतात. हे म्हणजे तुमच्या घराची चावी एखाद्या बाहेरच्या व्यक्तीच्या हाती लागण्यासारखा प्रकार आहे. लसीकरणाच्या काळात कोविन अॅपबद्दल पूर्ण विश्वास दाखवताना डेटा अगदी सुरक्षित राहील, असे सांगण्यात आले होते. डेटा लीक होऊ न देण्याची जबाबदारी सरकारची ठरते.