महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – अजयसिंग – नवीदिल्ली – भारत पाकिस्तानला जोरदार दणका देण्याची तयारी करत आहे. पाकिस्तानला जाणारे पाणी रोखण्यात भारत लवकरच यशस्वी होईल. पाणी कसे रोखायेच यावर आधारित प्रकल्पाचे काम सुरु आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. पाकिस्तानात जाणारे पाणी रोखण्याचे काम सुरु आहे आणि त्यात आम्ही यशस्वी होवू, असे सांगून ते म्हणाले, त्यानंतर हे रोखलेले पाणी राजस्थान, पंजाब आणि हरियाणा या राज्यांना मिळेल.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी मध्य प्रदेशात एका व्हर्चुअल रॅलीला संबोधित करताना सांगितले की, पंतप्रधान म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांनी नदी जोड प्रकल्पात भर दिला होता, ज्यावर मोदी सरकार वेगवान गतीने काम करत आहे. जेव्हा मी जलसंपदामंत्री होतो, तेव्हा १९७० पासून नऊ प्रकल्प रखडले होते. पंजाब, यूपी, हरियाणा इत्यादी राज्ये भांडत होती, त्यामुळे पाकिस्तानला फायदा होत होता. आम्ही नऊपैकी सात प्रकल्प पूर्ण केले. करारादरम्यान तीन नद्या भारत आणि पाकिस्तानला मिळाल्या, परंतु भारतातील नद्यांचे पाणी पाकिस्तानकडे जात होते, ते आता रोखणार आहोत, असे गडकरी यांनी सांगितले.
यावेळी गडकरी म्हणालेत, पंतप्रधान मोदींनी मला सांगितले पाण्याचा प्रश्न आधी सोडविला पाहिजे. पाण्याचा हा वाद संपवण्यासाठी मी जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा, हिमाचल, उत्तराखंड आणि राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांना बोलावले आणि सात प्रकल्प सुरु केले. याद्वारे आम्ही पाकिस्तानात जाणारे पाणी रोखू शकू. राजस्थान, हरियाणा आणि पंजाबला हे पाणी मिळेल.