महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ जुन । पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात अनेकदा सर्व्हर डाऊन असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. सर्व्हर डाऊन होणे एखाद्या रुग्णाच्या जीवावर बेतू शकतं. कारण केस पेपरपासून अक्षरशः डॉक्टर औषधांची नोंद कॉम्प्युटरवर करण्यापर्यंत सगळे सर्व्हरवर अवलंबून आहे. केस पेपरची नोंद केल्यानंतरच डॉक्टर रुग्णाला तपासतात. बहुतांश सर्वच विभागातील सर्व्हर डाऊन असल्याने रुग्णांची गैरसोय होत असल्याचे चित्र आहे. रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी, अधिकारी देखील या गोष्टीला कंटाळले आहेत. त्यांना रुग्णाच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
“आताची सर्व्हर सिस्टीम जुनी झालेली आहे. सकाळी ११ ते ०१ च्या दरम्यान रुग्ण जास्त असल्याने त्यावर लोड येऊन सर्व्हरवर ताण येतो. याचा नाहक त्रास रुग्ण आणि कर्मचाऱ्यांना होतो आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात आपण सर्व्हर सिस्टीम बदलत आहोत. गेली दहा वर्षे झालं तीच सिस्टीम असल्याने बदलण्याची वेळ आली.” -राजेंद्र वाबळे, यशवंतराव चव्हाण रुग्णालयाचे अधिष्ठाता