Ashadhi Wari : वारकऱ्यांसाठी आरोग्य यंत्रणा झालीये सज्ज; वारीत अडचणी उद्भवल्यास ‘इथे’ साधता येणार संपर्क

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ जुन । संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी (Dnyaneshwar Maharaj Palkhi) सोहळा ता. १८ ते ता. २३ या कालावधीत मार्गक्रमण करणार आहे. या काळात वारकऱ्यांच्या (Warkari) आरोग्याची काळजी घेण्‍यासाठी ६६६ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

याचबरोबर आरोग्यविषयक (Health Department) इतर उपक्रम राबवणाऱ्यावर आरोग्‍य विभागाने भर देत सज्‍जता केली आहे. पालखी सोहळ्याचा जिल्ह्यातील प्रवास ६६ किलोमीटर असणार आहे. ता. १८ व १९ असे दोन दिवस पालखी लोणंद येथे मुक्कामी आहे. यानंतर ता. २० रोजी तरडगाव, ता. २१ रोजी फलटण व ता. २२ रोजी बरड येथे पालखी मुक्कामी आहे.

पाडेगाव ते साधूबुवाचा ओढा मार्गावर १ उपजिल्हा रुग्णालय- फलटण व ४ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. येथील सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना वारकऱ्यांना आरोग्‍य सुविधा पुरविण्‍याचे आदेश देण्‍यात आले आहेत. याबरोबरच जिल्हा आरोग्य अधिकारी- १, अतिरिक्‍त जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी २, तालुका आरोग्य अधिकारी २, अतिरिक्‍त संचालक, जिल्‍हा क्षयरोग अधिकारी, हिवताप अधिकारी, विस्‍तार अधिकारी, कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्‍य सहा‍यक.

तसेच आरोग्‍य सहायिका, औषधनिर्माण अधिकारी, आरोग्‍यसेवक, सेविका, आरोग्‍यदूत, वाहनचालक, शिपाई असे ६६६ मनुष्‍यबळ तैनात करण्‍यात आले आहे. पाणी शुद्धीकरणासाठी ३४ पथके तैनात करण्‍यात आली आहेत. आरोग्य व्यवस्थापनांतर्गत वैद्यकीय संस्था – शासकीय-१२ व खासगी-१५१ एकूण १६३, आंतररुग्ण-शासकीय-१४० व खासगी-९०० एकूण १०४० बेडस् तयार ठेवण्‍यात आले असून, प्राथमिक शाळा ६१ व समाज मंदिर-११ एकूण ७२ अशी आरोग्‍य कक्षाची व्यवस्था करण्यात आल्‍याची माहिती आरोग्‍य विभागाने दिली आहे.

आरोग्‍याची समस्‍या आल्‍यास येथे साधा संपर्क
आरोग्याविषयी काही अडचणी उद्भवल्यास आरोग्य विभाग, जिल्‍हा परिषद सातारा- ०२१६२-२३३०२५, प्राथमिक आरोग्‍य केंद्र लोणंद (ता. खंडाळा) – ०२१६९-२९८१७३, उपजिल्हा रुग्णालय फलटण- ०२१६६ – २२२९४३ येथे संपर्क साधण्‍याचे आवाहन आरोग्‍य विभागाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *