महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ जुन । England vs Australia Ashes 2023 : ऐतिहासिक अॅशेस मालिकेची यावेळी धमाकेदार सुरुवात झाली आहे. पहिल्या कसोटीत एजबॅस्टन मैदानावर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी जबरदस्त खेळ दाखवला. मात्र, अखेरीस पाहुण्या कांगारू संघाने हा सामना 2 गडी राखून जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या पराभवानंतर इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्सच्या निर्णयावर नक्कीच प्रश्न उपस्थित होत आहेत.
एजबॅस्टन कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात इंग्लंडने 8 बाद 393 धावा करून पहिला डाव घोषित केला. स्टोक्सच्या या निर्णयावर अनेक दिग्गजांनी निश्चितच आश्चर्य व्यक्त केले होते. पण याकडे आता इंग्लंड संघाची नवी रणनीती म्हणून पाहिले जात आहे.
पहिल्या कसोटीतील पराभवानंतर बेन स्टोक्सने आपल्या निर्णयाबद्दल सांगितले की, मला कोणत्याही प्रकारचे दु:ख नाही. मी एक संधी म्हणून पाहिले. दिवस संपायला 20 मिनिटे बाकी असताना कोणत्याही फलंदाजाला खेळणे कधीही सोपे नसते. कुणालाच माहीत नाही, कदाचित रुट आणि अँडरसन बाद झाले असते, तर त्यावेळीही आमची तीच अवस्था पाहायला मिळाली असती, पराभवानंतरही आम्ही असेच खेळत राहू.
पुढे तो म्हणाला, मला माझ्या संघाचा अभिमान आहे की आम्ही हा कसोटी सामना ५ दिवस खेळू शकलो. या सामन्यात अनेक चढ-उतार आले. हा सामना मी कधीच विसरणार नाही. हरल्यावर दु:ख नक्कीच असते. पण आम्ही असेच खेळत राहू.
उस्मान ख्वाजा व्यतिरिक्त कर्णधार पॅट कमिन्सने अॅशेस 2023 च्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाच्या विजयात बॉल आणि बॅटने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आता दोन्ही संघांमधील मालिकेतील दुसरा कसोटी सामना 28 जूनपासून लॉर्ड्सवर खेळल्या जाणार आहे.