‘सुभेदार’ चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित, संवाद ऐकून शिवप्रेमी भारावले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ जुन । मराठी चित्रपटसृष्टीत छत्रपती शिवाजी महाराजांची यशोगाथा सांगणारे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. गेल्या काही वर्षात रिलीज झालेले ‘फर्जंद’, ‘पावनखिंड’, ‘फत्तेशिकस्त’, ‘शेर शिवराज’ या ‘शिवराज अष्टक’ चित्रपट मालिकेतील सिनेमांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. यानंतर आता लवकरच छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदवी स्वराज्याची माहिती देणारा सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित ‘सुभेदार गड आला पण…’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच लॉन्च करण्यात आला आहे.

सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित ‘सुभेदार’ चित्रपट २३ जून २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराजांची, तर मृणाल कुलकर्णी माता जिजाऊंची भूमिका साकारणार आहे. “आई भवानीच्या चरणी अर्पण करत आहोत श्री शिवराज अष्टकातील पाचवे चित्रपुष्प ‘सुभेदार’! २५ ऑगस्टला गाजणार सिंहगडाचा पोवाडा…” अशी घोषणा करीत निर्मात्यांनी या चित्रपटाचा टीझर लॉन्च केला आहे.

‘सुभेदार’ चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. १ मिनिट ४८ सेकंदाच्या टीझरमधील संवाद प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात. कोंढाणा किल्ल्याची मोहीम (सिंहगडाचे आधीचे नाव) आखताना सुभेदार तानाजी मालुसरे यांनी “आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं” असे वचन महाराजांना दिले होते. या चित्रपटात प्रेक्षकांना सुभेदार तानाजी मालुसरे यांचा असा संपूर्ण इतिहास पाहायला मिळणार आहे. तानाजी मालुसरे यांची भूमिका अभिनेते अजय पुरकर साकारणार आहेत.

दरम्यान, चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यावर यावर शिवप्रेमी आणि ऐतिहासिक चित्रपटाच्या चाहत्यांनी कमेंट करीत ‘सुभेदार’च्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. एका युजरने “टीझर पाहून त्यातील संवाद ऐकून अंगावर काटा आला, आता चित्रपट पाहण्याची उत्सुकता खूपच वाढली आहे, जय शिवराय!”, अशी कमेंट केली आहे. तसेच दुसऱ्या एका युजरने “आता सिंहगडाचा पोवाडा भी गाजणार अन सुभेदार भी…हर हर महादेव” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *