वेस्ट इंडिजविरुद्धच्या संघाची घोषणा होताच सुनील गावस्कर यांचा पारा चढला ; म्हणाले ……. तर मग रणजी बंद करा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ जुन । वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी आणि वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये दारूण पराभव पत्करल्यानंतर टीम इंडियावर आधीच टीका होत आहे. त्यात आता वेस्ट इंडिजविरुद्धचा संघ जाहीर करण्यात आल्यानंतर आता या सामन्यात टीम इंडिया चांगली कामगिरी करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यात रोहित शर्माच टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि वेगवान गोलंदाज उमेश यादव यांना वेस्ट इंडिज दौऱ्यात स्थान देण्यात आलेलं नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

यशस्वी जायसवाल आणि ऋतुराज गायकवाड यांना पहिल्यांदाच टेस्ट टीममध्ये स्थान देण्यात आलं आहे. मात्र, देशांतर्गत क्रिकेट सामन्यात नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या सरफराज खानला वेस्ट इंडिज दौऱ्यात स्थान देण्यात आलेलं नाहीये. सरफराज खानला संघात स्थान न देण्यात आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. खासकरून सुनील गावस्कर यांना बीसीसीआयच्या या निर्णयाचं आश्चर्य वाटलं आहे. सरफराज खानला संधी न मिळाल्याने सुनील गावस्कर जाम भडकले आहेत. त्यांनी थेट बीसीसीआय आणि निवड समितीवर जोरदार टीका केली आहे.

 

मग रणजी बंद करा
सुनील गावस्कर यांनी थेट निवड समितीच्या निकषांवरच बोट ठेवलं आहे. आयपीएलमधील कामगिरीच्या आधारेच जर टेस्ट टीमची निवड होत असेल तर रणजी ट्रॉफी खेळवणं बंद केलं पाहिजे, असा संताप सुनील गावस्कर यांनी व्यक्त केला आहे. सरफराज खानने रणजीतील तीन सीजनमध्ये 100च्या सरासरीने धावा केल्या आहेत. आता टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी त्याला काय करावे लागणार आहे? प्लेइंग इलेवनमध्ये त्याचा समावेश होऊ शकणार नाही. पण किमान त्याची संघात तरी निवड केली पाहिजे ना?; असा रोकडा सवाल गावस्कर यांनी केला आहे.

त्याला स्पष्टच सांगा
सरफराजच्या कामगिरीवर लक्ष दिलं जात नाही, असं त्याला सांगितलं पाहिजे. नाही तर रणजी ट्रॉफीत खेळणं बंद कर. रणजीत खेळून काहीच फायदा होणार नाही हे त्याला सांगितलं पाहिजे. तुम्ही केवळ आयपीएलची कामगिरीच पाहता आणि रेड बॉल क्रिकेटसाठी चांगलं आहे असं तुम्हाला वाटतं, असं ते म्हणाले.

सरफराजची सरासरी 80ची
सरफराज खानने आतापर्यंत 37 फर्स्ट क्लास सामन्यात 3505 धावा कुटल्या आहेत. त्यात 13 शतक आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने सर्वाधिक 301 धावाही केल्या आहेत. 79.65च्या सरासरीने त्याने या धावा केल्या आहेत. इतकं चांगलं रेकॉर्ड असूनही सरफराजला टेस्ट टीममध्ये घेण्यात आलेलं नाही. ऋतुराज गायकवाडला टी-20मधील परफॉर्मन्सच्या आधारे टेस्ट टीममध्ये स्थान मिळू शकतं.

असा आहे वेस्ट इंडिज दौरा
पहिली कसोटी – 12 ते 16 जुलै, डोमिनिका
दुसरी कसोटी – 20 ते 24 जुलै, पोर्ट ऑफ स्पेन

पहिली वनडे – 27 जुलै, ब्रिज टाऊन
दुसरी वनडे – 29 जुलै, ब्रिज टाऊन
तिसरी वनडे – 1 ऑगस्ट, पोर्ट ऑफ स्पेन

पहिली टी-20 – 3 ऑगस्ट
दुसरी टी-20 – 6 ऑगस्ट
तिसरी टी-20 – 8 ऑगस्ट
चौथी टी-20 – 12 ऑगस्ट
पाचवी टी-20 – 13 ऑगस्ट

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठीची भारताची टेस्ट टीम
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जयसवाल, अजिंक्य रहाणे (उप-कर्णधार), केएस भरत, ईशान किशन, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनादकट, नवदीप सैनी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *