World Cup 2023 : पाकिस्तान भारतात वर्ल्ड कप खेळणार की नाही? अनिश्चिततेचं सावट, नवी अपडेट समोर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ जुन । भारतात होणाऱ्या वनडे क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तानचा सहभाग अद्याप अनिश्चितच आहे. या स्पर्धेतील पाक संघाच्या सहभागाबाबतच्या सर्व मुद्द्यांचा आम्ही आढावा घेत आहोत, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले. भारतातील वर्ल्ड कप सहभागाबाबत पाकिस्तान सरकारने प्रथमच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

‘आयसीसीने काही दिवसांपूर्वी या स्पर्धेसाठी थेट पात्र ठरलेल्या संघांना स्पर्धेचा प्राथमिक कार्यक्रम पाठवला होता. त्या वेळी आमचा स्पर्धेतील सहभाग सरकारच्या मंजुरीवरच अवलंबून असेल,’ असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) सांगितले होते. पाकिस्तानचा सहभाग निश्चित नसल्यामुळे स्पर्धा कार्यक्रम लांबणीवर पडत असल्याचेही सांगितले जात आहे. ‘राजकारण आणि खेळाची सांगड घातली जाऊ नये, असे पाकिस्तानचे मत आहे.

पाकिस्तानात क्रिकेट न खेळण्याचा भारताचा निर्णय दुर्दैवी आहे. वर्ल्ड कप स्पर्धेबाबत आमचे सर्व घडामोडीवर लक्ष आहे. सहभागाबाबतच्या सर्व मुद्द्यांचा आम्ही सर्वकष विचार करीत आहोत. या स्पर्धेतील सहभागाच्या वेळी पाकिस्तानच्या खेळाडूंच्या सुरक्षेचाही मुद्दा विचारात घेण्यात येईल. स्पर्धेत खेळण्याबाबतची सूचना पाक बोर्डाला योग्य वेळी देण्यात येईल,’ असे पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मुमताझ झाहरा बलोच यांनी सांगितले.

भारतातील वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेस ५ ऑक्टोबरपासून सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर १५ ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात अहमदाबादला गटसाखळीतील लढत होईल. पाकिस्तानचा क्रिकेट संघ २०१६च्या वर्ल्ड कप टी-२० स्पर्धेनंतर भारतात खेळलेला नाही. त्या वेळी भारताने पाकिस्तानच्या खेळाडूंच्या सुरक्षेची पूर्ण ग्वाही दिलेली नाही, असे सांगून पाकिस्तानने स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली होती. त्यामुळे पाकिस्तानच्या लढती धमरशालाऐवजी कोलकाता येथे घेण्याचा निर्णय भारताने घेतला होता. वर्ल्ड कपमधील आपल्या अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलियाच्या सामन्यांच्या ठिकाणांमध्ये अदलाबदल करण्याची सूचना पाकिस्तानने ‘आयसीसी’ला केली आहे.

प्रस्तावीत कार्यक्रमानुसार पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया लढत २० ऑक्टोबरला बेंगळुरूला, तर पाक-अफगाणिस्तान लढत २३ ऑक्टोबरला चेन्नईत होणार आहे. सामन्यांच्या ठिकाणातील बदल सुरक्षेचा प्रश्न असला, तरच करण्यात येतो. पाकिस्तानने आपल्या पत्रात सुरक्षेचा कोणताही उल्लेख केला नव्हता. त्यामुळे ‘आयसीसी’ने पाकची मागणी फेटाळली आहे. वर्ल्ड कप स्पर्धेचा इतिहास बघितल्यास या स्पर्धांचा कार्यक्रम किमान एक वर्षे अगोदर निश्चित होतो. आता हा कार्यक्रम पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *