आता एका रुपयात मिळणार पीक विमा, राज्य सरकारची नवी योजना, शेतकऱ्यांना कसा फायदा होणार? जाणून घ्या

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ जुन । महाराष्ट्रात २०१६ पासून पंतप्रधान पीक विमा योजना राबवण्यात येत आहे. असे असताना, यंदापासून राज्य सरकारच्या वतीने नवी पीक विमा योजना राबवली जाणार आहे. यामध्ये एक रुपयात शेतकऱ्यांचा विमा काढण्यात येणार आहे. ‘सर्वसमावेशक पीक विमा’ योजना असे नाव असून, यासंदर्भात राज्य सरकारच्या कृषी विभागाने नुकताच याविषयी शासननिर्णय जारी केला आहे.

यापूर्वी पंतप्रधान पीक विमा योजनेत खरीप हंगाम २ टक्के, रब्बी हंगाम १.५ टक्के तर नगदी पिकांसाठी ५ टक्के पीक विम्याचा हफ्ता शेतकऱ्यांना भरावा लागत होता. उर्वरित शेतकऱ्यांच्या हफ्त्याची रक्कम राज्य शासन देत होते. यंदापासून शेतकऱ्यांना दोन्ही हंगामांसाठी केवळ एक रुपया भरावा लागणार आहे. बाकी शेतकऱ्यांच्या हिश्शाची रक्कम राज्य शासन भरणार आहे.

२०२३-२४ सालाच्या अर्थसंकल्पात यासंदर्भात घोषणा करण्यात आली होती. त्याची यंदापासून अंमलबजावणी होत आहे. विमा घेण्यासाठी शेतकरी पीक विमा पोर्टल, सामुदायिक सुविधा केंद्र किंवा बँकेत शेतकरी आपला अर्ज सादर करू शकतील.

पेरणी ते काढणीपश्चात नुकसानीच्या सर्व टप्प्यातील नुकसान भरपाईस विमा घेणारे शेतकरी पात्र राहतील. त्याबरोबरच नैसर्गिक आपत्ती उदाहरणार्थ आग, वीज पडणे, वादळ, चक्रीवादळ, पूर, भूस्खलन, दुष्काळ, कीड, रोगराई, पावसाची अनियमितता, पूरपरिस्थिती, गारपीट, हवामानाच्या प्रतिकूलतेमुळे पिकांची पेरणी न होणे, स्थानिक आपत्तीमुळे होणारे नुकसान, काढणीपश्चात नुकसान आदी कारणांसाठी शेतकऱ्यांना पीक नुकसानीची भरपाई मिळणार आहे.

नमो शेतकरी सन्मान योजनेनंतर मोठा निर्णय
केंद्र सरकारनं सुरु केलेल्या पीएम किसान योजनेप्रमाणं महाराष्ट्र सरकारनं देखील शेतकऱ्यांना एका वर्षाला सहा हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. राज्य सरकारकडून पात्र शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम दिली जाणार आहे. दुसरीकडे केंद्र सरकारच्या योजनेद्वारे देखील पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना सहा हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये मिळतात. नमो शेतकरी योजनेनंतर राज्य सरकारनं आणखी एक मोठा निर्णय घेत शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ एक रुपयात देण्याचा निर्णय घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *