महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० जुन । वन डे वर्ल्ड कप पात्रतेचे आपले स्वप्न साकार करण्यासाठी आज ओमानने झुंजार खेळ केला, पण ते आपले आव्हान जिवंत राखण्यात अपयशी ठरले. झिम्बाब्वेच्या 333 धावांच्या जबर आव्हानाचा पाठलाग करताना ओमानचा संघ 9 बाद 318 धावांपर्यंत पोहोचला आणि त्यांचे वन डे वर्ल्ड कप पात्रतेचे आव्हान संपुष्टात आले. मात्र झिम्बाब्वेने विजय मिळवत आपले वन डे वर्ल्ड कपचे तिकीट जवळजवळ बुक केले आहे. 2 जुलैला श्रीलंकेविरुद्ध विजय मिळविल्यावर या तिकिटावर शिक्कामोर्तब होईल.
झिम्बाब्वेने सीन विल्यम्सने या स्पर्धेतील आपले तिसरे शतक झळकावताना 103 चेंडूंत 142 धावांची खेळी केली आणि सिपंदर रझासोबत चौथ्या विकेटसाठी 102 धावांची भागीही रचली. त्याच्या याच झुंजार खेळामुळे झिम्बाब्वेने 7 बाद 332 अशी दमदार धावसंख्या उभारली. फय्याज बटने 79 धावांत 4 विकेट टिपल्या. त्यानंतर 333 धावांचा पाठलाग करताना कश्यप प्रजापतीच्या 103 धावांच्या खेळीने ओमानला स्पर्धेत ठेवले. तळाला मोहम्मद नदीमने 18 चेंडू 30 धावांची खेळी करून मॅच जिंकण्याचा प्रयत्न केला, पण त्याचे प्रयत्न अपयशी ठरले.