महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.४ जुलै ।
# शरद पवार गट : अजितदादांसह नऊ मंत्र्यांना अपात्रतेच्या नोटिसा, पटेल-तटकरे बडतर्फ
# अजितदादा गट : जयंत पाटलांची हकालपट्टी करून सुनील तटकरेंना नेमले नवे प्रदेशाध्यक्ष
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून अजित पवार यांच्यासह नऊ नेत्यांनी भाजप-शिवसेनेच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री व मंत्रिपद स्वीकारले. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत शह- काटशहाचे राजकारण सुरू झाले. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिस्तभंगाचा ठपका ठेवून ९ जणांना अपात्रतेच्या नोटिसा बजावल्या. त्यांच्यावर कारवाईसाठी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिले. तसेच बंडात साथ देणारे प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे यांना बडतर्फ करण्याचे आदेशही पक्षाने काढले. दुसरीकडे, अजित पवार गटाने जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी केली. त्यांच्या जागी सुनील तटकरे यांची तर विधिमंडळ नेतेपदी अजित पवार यांची नेमणूक केली. तसेच जयंत पाटील व जितेंद्र आव्हाडांवर कारवाईचे पत्रही विधानसभा अध्यक्षांना दिल्याचे प्रफुल्ल पटेल व अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी ५ जुलै रोजी मुंबईत स्वतंत्र बैठका ठेवल्या आहेत. त्या दिवशी जोरदार शक्तिप्रदर्शन करून पुढील रणनीती जाहीर केली जाईल.
अमोल कोल्हे परत फिरले
शनिवारी अजितदादांसोबत असलेले साताऱ्याचे आमदार मकरंद पाटील, खासदार अमोल कोल्हे यांच्यासह काही आमदारांनीही ‘आम्ही शरद पवारां’सोबतच असल्याचे जाहीर केले. तर नीलेश लंकेंसह काही आमदार द्विधा मन:स्थितीत आहेत.
किती आमदार सोबत, दादा गटाला नेमके सांगताच येईना
तुमच्यासोबत किती आमदार?’ या प्रश्नाचे उत्तर मात्र प्रफुल्ल पटेल व अजित पवार देऊ शकले नाहीत. पक्ष व चिन्ह आमचे आहे. आता तुम्ही त्यांनाच विचारा, किती आमदार तिकडे उरलेत, असे म्हणत त्यांनी या प्रश्नावर जास्त बाेलणे टाळले.
महिला प्रदेशाध्यक्ष चाकणकर, मिटकरींना प्रवक्तेपद
महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना अजितदादा गटाने महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. आमदार अमोल मिटकरी प्रवक्ते, मंत्री अनिल पाटील प्रतोद तर सूरज चव्हाण यांना युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्षपद जाहीर केले आहे.
हकालपट्टीचा धडाका सुरू
अजितदादांसोबत गेलेले प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, अकोला जिल्हाध्यक्ष विजय देशमुख, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष नरेंद्र राणेंसह युवक आघाडीच्या काही पदाधिकाऱ्यांचीही हकालपट्टी केल्याचे जयंत पाटील व मेहबूब शेख यांनी पत्राद्वारे जाहीर केले.
सुप्रिया सुळे यांना मात्र अभय
‘सुप्रिया सुळेंवर कारवाई करणार का?’ या प्रश्नावर अजित म्हणाले, ‘आम्ही हकालपट्टीच करायला बसलोय का? आम्हाला बेरजेचे राजकारण, कामे करायचीत.’ शनिवारी सुप्रिया सुळे यांनीसुद्धा ‘अजित माझा दादा आहे, आमचे वाद नाहीत’ असे सांगितले होते.
पाच जुलैपर्यंत परत येणाऱ्यांचे स्वागत, अन्यथा कारवाई करावीच लागेल
अजित पवार यांच्यासोबत गेलेले अनेक आमदार आता शरद पवार आणि माझ्याशी संपर्क करत आहेत. आम्हाला शपथविधीला धोक्याने नेले होते, असे ते आता सांगत आहेत. त्यामुळे ज्या ९ आमदारांनी शपथ घेतली ते आमदार वगळता त्यांच्यासोबत गेलेल्या सर्वांसाठी आमची दारे खुली आहेत. ५ जुलैपर्यंत त्यांना आम्ही मुदत देत आहोत. तोपर्यंत ते परत आले नाहीत तर मात्र आम्हाला त्यांच्यावर कारवाई करावी लागेल. – जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, शरद पवार गट
राष्ट्रवादीत नियुक्त्यांचे मला अधिकार, म्हणून आमचाच निर्णय अधिकृत : पटेल
प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर करत होते, तेव्हा पत्रकारांनी ‘मग तुमच्या पक्षाचे अध्यक्ष कोण?’ असा प्रश्न विचारला. त्यावर ‘शरद पवार आहेत हे विसरलात का?’ असा प्रतिप्रश्न अजितदादांनी केला.‘ पण त्यांनी तर तुमच्यावर कारवाई केली. नवे व्हीप नेमले. त्यांचा निर्णय चालणार नाही का?’ या प्रश्नावर पटेल यांनी तडक ‘नाही’ असे उत्तर दिले. घटनेनुसार, राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून मलाच नियुक्त्यांचा अधिकार आहे. त्याच अधिकारात मी नवीन नियुक्त्या केल्या आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.