’58 व्या वर्षी निवृत्ती घेतात’ असं 83 वर्षीय शरद पवारांना सांगणाऱ्या अजित पवारांच्या सहकाऱ्यांचं वय किती?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.६ जुलै । आता 83 वर्षे वय झाल्याने कुठेतरी थांबायला पाहिजे, असं मत व्यक्त करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांना जाहीर सभेत निवृत्तीचा सल्ला दिला.

“सरकारी सेवेत वयाच्या 58 व्या वर्षी निवृत्त व्हावे लागते. सनदी अधिकारी वयाच्या 60 व्या वर्षी निवृत्त होतात. भाजपामध्ये 75 व्या वर्षी निवृत्त व्हावे लाहते. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांनाही हा नियम लाग करण्यात आला. 82-83 व्या वर्षी थांबणार आहात की नाही,” असा खोचक सवाल अजित पवार यांनी शरद पवारांना केला.

तुम्ही शतायुषी व्हा. आम्हाला आशीर्वाद द्या. आम्ही कुठे चुकत असलो तर सांगा. चुका दुरुस्त करण्याचा आम्ही प्रयत्न करु. शेवटी नवीन नेतृत्व पुढे आले पाहिजे, असे मतही अजित पवारांनी व्यक्त केलं.

मात्र 58 व्या वर्षीच्या सरकारी निवृत्तीसंदर्भात बोलणाऱ्या अजित पवार यांचं स्वत:चं वय 63 आहे. त्यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी झाला आहे.

अजित पवारांबरोबर शिंदे सरकारमध्ये सहभागी होत मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या त्यांच्या इतर सहकाऱ्यांचं वय किती आहे हे पाहूयात…

अदिती तटकरे या सर्वात तरुण आमदारांपैकी एक आहेत. त्यांचा जन्म 16 मार्च 1988 रोजी झाला असून त्या 35 वर्षांच्या आहेत.

अजित पवार यांचे खंदे समर्थक असलेले धनंजय मुंडे यांचा जन्म 15 जुलै 1975 साली झाला असून ते लवकरच 48 वर्षांचे होणार आहेत.

अजित पवार गटातील संजय बनसोड यांचा जन्म 31 डिसेंबर 1973 चा असून ते 49 वर्षांचे आहेत.

अनिल पाटील यांचा जन्म 7 जुलै 1968 चा आहे. अनिल पाटील हे 2023 मध्ये 55 वर्षांचे होतील.

अजित पवारांबरोबर शिंदे सरकारमध्ये सहभागी होत मंत्रीपदाची शपथ घेणारे धर्मराव बाबा आत्राम हे 56 वर्षांचे आहेत.

शरद पवारांचे निकटवर्तीय अशी ओळख असलेल्या मात्र अजित पवारांना साथ देणाऱ्या दिलीप वळसे पाटील यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1956 चा असून ते 66 वर्षांचे आहेत.

केंद्रातील राष्ट्रवादीचा विश्वासाचा चेहरा असलेल्या प्रफुल्ल पटेल यांचं वय 66 वर्ष आहे. त्यांचा जन्म 17 फेब्रुवारी 1957 रोजी झाला आहे.

हसन मुश्रीफ यांचा जन्म 24 मार्च 1954 चा आहे. मुश्रीफ यांचं वय 69 इतकं आहे.

छगन भुजबळ हे सर्वात ज्येष्ठ नेत्यांपैकी आहेत. भुजबळ यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1947 रोजी झाला आहे. भुजबळ यांचं वय 75 वर्ष इतकं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *