देशाला हुकुमशाहीपासून वाचवणे जनतेच्या हातात : पृथ्वीराज चव्हाण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ जुलै । काँग्रेसमुक्त म्हणणे म्हणजे भाजपला विरोधी पक्ष नको आहे. छोटे पक्ष नको आहेत. एकाच पक्षाचे सरकार पाहिजे म्हणजेच हुकूमशाही पाहिजे. देशाला हुकुमशाहीपासून वाचवणे जनतेच्या हातात आहे अशी प्रतिक्रिया आज (दि. ८) माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. मलकापूर (ता. कराड) येथे ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे प्रमुख उपस्थित होते.

आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, निष्ठा हा ज्याच्या त्याच्या स्वातंत्र्याच्या चरित्राचा एक भाग आहे. आज एका महत्त्वाच्या पक्षामध्ये फूट पडलेली आहे. तशाच प्रकारची फूट यापूर्वी मी तीन वेळेला पाहिलेली आहे. छोट्या मोठ्या प्रमाणात माणसे येत जातात. त्यामुळे सत्तेचा गैरवापर, दबाव, दहशत, ईडी, सीबीआय याचा वापर करून काही नेते दहशतीखाली गेले असले तरी माणसे सोडून जाणार नाहीत. जे शिवसेनेच्या बाबतीत झाले. खासदार, आमदार सोडून गेले, मात्र माणसे गेली नाहीत. याही पक्षात नेते सोडून गेले असले तरी माणसे जाणार नाहीत, याचा प्रत्यय काही दिवसातच येईल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या फुटीबाबत राष्ट्रवादीचे नाव न घेता व्यक्त केला.

चव्हाण पुढे म्हणाले की, विधानसभा अध्यक्षांपुढे एकनाथ शिंदे गटाविरुद्ध पक्षांतर बंदीची कारवाई चालू झालेली आहे. त्यामुळे कोणाला नोटीस पाठवायचे, कोणाला साक्षी करता बोलवायचे हे ठरवून विधानसभा अध्यक्ष त्यांची कार्यवाही करतील‌. माझ्या माहितीप्रमाणे सुप्रीम कोर्टाने 11 मे रोजी हा वाद विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केला आहे. त्यामुळे 90 दिवसांच्या आत त्यांना निवाडा द्यावा लागेल. म्हणजेच 10 ऑगस्टच्या सुमारास निलंबनाच्या बाबतींत विधानसभा अध्यक्षांना निवाडा द्यावा लागेल. विधानसभेचे अध्यक्ष हे घटनात्मक पदावरती बसलेले आहेत. त्यामुळे त्यांना घटनेच्या चौकटीमध्ये राहून काम करावे लागणार आहे. ते विधी तज्ञ आहेत. त्यामुळे ते योग्य तो निर्णय घेतील. त्यांनी घेतलेला निर्णय अयोग्य आहे असे जर कोणाला वाटत असेल तर त्यांना सुप्रीम कोर्टात जायचा मार्ग मोकळा आहे.

सध्या विरोधी पक्ष नेत्याचे चर्चा करण्याची गरज नाही, असे सांगत आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, संसदेत परंपरा ठरलेली आहे. पार्लमेंटमध्ये, विधिमंडळामध्ये सत्ताधारी पक्षाचा मोठा गट असतो त्याचा नेता पंतप्रधान होतो. विरोधी पक्षाचा सर्वात मोठा गट असेल, गटबंधन आघाडी असेल तर सर्वात मोठ्या पक्षाचा नेता विरोधी पक्ष नेता बनतो. अजूनही विरोधी पक्षातील सर्वात मोठा गट कोण आहे, यामध्ये स्पष्टता नाही. ज्या दिवशी स्पष्टता येईल त्या दिवशी निर्णय होईल. त्यामुळे त्याबाबत आता चर्चा करण्याची गरज नाही.

काँग्रेसमधून आमदार फुटून जाणं शक्य नाही
पक्षांतर बंदी कायद्याप्रमाणे दोन तृतीयांश आमदारांना बाजूला जावे लागते. त्यामुळे काँग्रेस पक्षामध्ये फुटीची शक्यता नाही. काँग्रेस पक्षामध्ये 45 आमदारांचा आमचा गट आहे. त्यातील 30-31 आमदार फुटून बाहेर जातील याची अजिबात शक्यता नाही. भाजपच्या गोटातून खोट्या अफवा पसरवण्याचे काम सुरू आहे. यापूर्वी विविध पक्षांमधून भाजपमध्ये गेलेल्या लोकांच्या गर्दीमध्ये कोणाला काय पद मिळणार? हे बघूया. त्यांना साधे मंत्रिमंडळाचा विस्तार करता येत नाही. विधान परिषदेच्या बारा आमदारांची नियुक्ती करता येत नाही, हे वाटते तितके सोपे नाही, असेही आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

राजकीय अमिषांना बळी पडणारांची चिंता
सध्याच्या राजकारणाची परिस्थिती पाहता सामान्य माणसाचा स्वतःवरतीच विश्वास राहिला आहे की नाही हे पाहणे गरजेचे आहे. यामध्ये फक्त राजकीय नेत्यांनाच दोष देऊन चालणार नाही. त्या राजकीय नेत्याला निवडून कोणी दिलं? अमिषांना कोण बळी पडले? हेही कोणालातरी विचारावे लागणार आहे.

काँग्रेसमुक्त म्हणजे भाजपला विरोधी पक्ष नको
भाजपला एका पक्षाची सत्ता किंवा एका पक्षाची हुकूमशाही प्रस्थापित करायची आहे, हे मी गेली अनेक दिवसांपासून सांगत आलो आहे. काँग्रेस मुक्त असे कित्येक वेळेला अमित शहा यांनी म्हटले होते. काँग्रेसमुक्त म्हणणे म्हणजे तुम्हाला विरोधी पक्ष नको आहे. छोटे पक्ष नको आहेत. एकाच पक्षाचे सरकार पाहिजे आहे. हुकूमशाही पाहिजे. त्यामुळे देशात हुकूमशाही निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हुकुमशाहीच्या दिशेने देश नेण्याचे काम सुरू आहे. ते जाऊ द्यायचं की नाही हे जनतेच्या हातात आहे, असेही माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *