महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० जुलै । Ashes 2023 Eng vs Aus : अखेर यजमान इंग्लंड क्रिकेट संघाने अॅशेस या प्रतिष्ठेच्या मालिकेतील आव्हान कायम राखले. पहिल्या दोन कसोटीत पराभूत झालेल्या इंग्लंडने येथे झालेल्या तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियावर तीन विकेट राखून मात केली. त्यामुळे आता इंग्लंडचा संघ अॅशेस मालिकेत १-२ असा पिछाडीवर आहे. या मालिकेतील दोन कसोटी अद्याप बाकी आहेत.
ऑस्ट्रेलियाकडून इंग्लंडसमोर २५१ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. इंग्लंडने तिसऱ्या दिवसअखेरीस बिनबाद २७ धावा केल्या होत्या. मिचेल स्टार्कने बेन डकेट (२३ धावा) व मोईन अली (५ धावा) यांना झटपट पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मिचेल मार्शने झॅक क्राउलीला ४४ धावांवर बाद केले. त्यामुळे इंग्लंडची अवस्था ३ बाद ९३ धावा अशी झाली.
❤️ The match-winning moment…
Chris Woakes, what a man 👏 #EnglandCricket | #Ashes pic.twitter.com/hnhvEMu0jR
— England Cricket (@englandcricket) July 9, 2023
ज्यो रुट व हॅरी ब्रुक ही जोडी स्थिरावणार असे वाटत असतानाच कर्णधार पॅट कमिन्सच्या. गोलंदाजीवर रुट २१ धावांवर बाद झाला. त्यानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स यालाही निर्णायक क्षणी ठसा उमटवता आला नाही. स्टार्कनेच त्याला १३ धावांवर बाद केले. यानंतर डावखुरा गोलंदाज स्टार्कने जॉनी बेअरस्टोचा पाच धावांवरच त्रिफळा उडवला. इंग्लंडची अवस्था ६ बाद १७१ धावा अशी झाली.
तळाच्या फलंदाजांची यशस्वी झुंज
हॅरी बुकला अॅशेस मालिकेत आतापर्यंत सूर गवसला नव्हता; पण या डावात त्याने इंग्लंडला गरज असताना दबावाखाली नेत्रदीपक खेळी केली. त्याने ९३ चेंडूंमध्ये ९ चौकारांसह ७५ धावांची खेळी साकारली. मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. याप्रसंगी कसोटीला कलाटणी मिळणार असे वाटू लागले; पण ख्रिस वोक्स व मार्क वूड या तळाच्या फलंदाजांनी इंग्लंडसाठी मोलाची कामगिरी करीत विजयावर शिक्कामोर्तब केले. वोक्स याने नाबाद ३२ धावांची आणि वूड याने नाबाद १६ धावांची खेळी केली. वूड याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.