महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ जुलै । भारतीय क्रिकेट संघ 12 जुलै म्हणजेच बुधवारपासून वेस्ट इंडिज (WI vs IND) विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. 2 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना रोल्यू, डॉमिनिका येथे खेळवला जाईल. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ या मालिकेसाठी जोरदार तयारी करत आहे. या मालिकेसाठी 16 सदस्यीय भारतीय संघ वेस्ट इंडिजला गेला आहे. यामध्ये चार खेळाडू असे आहेत ज्यांनी कसोटी पदार्पण केले नाही. यशस्वी जैस्वाल पहिल्या कसोटीत पदार्पण करेल याची खात्री आहे. तो रोहित शर्मासोबत ओपनिंग करताना दिसणार आहे.
आणखी एक खेळाडू पदार्पण करेल!
यशस्वी जैस्वाल व्यतिरिक्त आणखी एक खेळाडू भारतीय संघात पदार्पण करणार आहे. तो खेळाडू म्हणजे यष्टिरक्षक इशान किशन. ऋषभ पंतच्या अपघातानंतर केएस भरत भारताकडून कसोटीत कीपिंग करत होता. मात्र आता इशान किशनला संधी मिळणार आहे. याचे कारण भरतचे सततचे अपयश आहे. त्याची किपिंग चांगली आहे पण बॅटने धावा करण्यात तो सतत अपयशी ठरत आहे.
सराव सामन्यात चित्र स्पष्ट
कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाने आपापसात दोन दिवसीय सराव सामना खेळला. यामध्ये अश्विन इलेव्हन विरूद्ध रोहित इलेव्हन असा सामना रंगला. त्यात इशानला अश्विन इलेव्हनमध्ये ठेवण्यात आले. म्हणजेच आघाडीच्या गोलंदाजांविरुद्ध तो विकेटकीपिंग करत होता. पण इशान किशनला एक बाब अडचणीची ठरू शकते. रणजी ट्रॉफीमध्ये तो झारखंडसाठी खेळत नाही. भारतीय आक्रमणाकडे रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजासारखे अनुभवी फिरकी गोलंदाज आहेत. अशा परिस्थितीत इशान संधी मिळाल्यास त्यांच्याविरुद्ध कसा टिकून राहतो, हे पाहावे लागेल.
फलंदाजीत गेम चेंजर ठरू शकतो!
इशान किशन फलंदाजीत टीम इंडियासाठी गेम चेंजर ठरू शकतो. त्याची फलंदाजीची शैली ऋषभ पंतसारखीच आहे. इशान मुक्तपणे शॉट्स खेळण्यावर भर देतो. दुसरीकडे, भरतने 5 कसोटीत केवळ 129 धावा केल्या आहेत. या कारणास्तव त्याला बाहेर बसवण्याचा निर्णय घेतला आहे.