महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ जुलै । आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या (Today History) असतात. आज म्हणजे 14 जुलै रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवगंत शंकरराव चव्हाण यांचा जन्म त्याशिवाय आजच्याच दिवशी 2013 मध्ये पोस्ट ऑफिसची तार सेवा कायमस्वरुपी बंद करण्यात आली. याशिवाय इतिहासात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.
गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म
गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म 14 जुलै 1856 रोजी कऱ्हाडमधील टेंभू येथे झाला. गोपाळ गणेश आगरकर महान सामाजसुधारक, लेखक, पत्रकार, शिक्षणतज्ज्ञ होते. ब्रिटीशांच्या काळात त्यांनी भारतीय समाजात जाती प्रणाली आणि अस्पृश्यतेसारख्या कुरोतियांना काढून टाकण्यासाठी बरेच प्रयत्न केले.
गोपाळ गणेश आगरकर हे लोकमान्य टिळकांचे सहकारी आणि ’केसरी’चे पहिले संपादक होते. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे एक संस्थापक आणि फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य, समाजसुधारक, विचारवंत आणि शिक्षणतज्ञ होते.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवगंत शंकरराव चव्हाण यांचा जन्म
महाराष्ट्र राज्याचे चौथे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा जन्म 14 जुलै 1920 रोजी झाला होता. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शंकरराव चव्हाण यांनी मोठी भरारी घेतली. पाटबंधारे मंत्री म्हणून त्यांनी भरीव कामगिरी केली. कृष्णा-गोदावरी पाणी तंट्यात त्यांची भूमिका वाखाणण्यासारखी आहे. गोदावरी, पूर्णा आणि मांजरा या धरणांद्वारा त्यांनी मराठवाड्याचा विकास घडवून आणला. जायकवाडी प्रकल्प हा शंकररावजींच्याच प्रयत्नाचे मोठे फळ आहे.
163 वर्षांची तार सेवा बंद
आजच्याच दिवशी 2013 मध्ये पोस्ट ऑफिसची तार सेवा कायमस्वरुपी बंद करण्यात आली. जवळपास 163 वर्षांपासून ही सेवा सुरु होती. आजमितीला भारतीय डाक विभागाची व्याप्ती ही जगामध्ये सगळ्यात मोठं आणि सर्वाधिक पोस्ट ऑफिसेसची संख्या असणारं खातं म्हणून आहे. पण अधुनिकतेच्या काळात तार सेवा फिकी पडली, त्यामुळे डाक विभागाने बंद करण्याचा निर्णय घेतला.
फ्रेंच क्रांतीची सुरुवात –
1789 मध्ये आजच्याच दिवशी फ्रेंच क्रांतीची सुरुवात झाली. पॅरिसमध्ये नागरिकांनी फ्रेंच राज्यसत्तेचे दडपशाहीचे चिन्ह असलेल्या बॅस्टिल तुरुंगावर हल्ला केला. या लोकांनी आतील सात बंद्यांची मुक्तता केली. ही घटना म्हणजे फ्रेंच क्रांतीची सुरवात होती.