महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ जुलै । पुण्यात आगीच्या घटनांचे सत्र थांबता थांबेना. शहरातील कोंढवा बुद्रुक येथील येवलेवाडी येथे एका गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. पुणे आणि पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार कपड्याच्या मोठ्या गोडाऊनला ही आग लागली असून ती आग वेगाने पसरत आहे. या आगीमुळे परिसरात धुराचे लोट दूरवर पसरले आहेत. मात्र या आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.
बिबवेवाडी परिसरातील गंगाधाम चौक शत्रुंजय मंदिर रस्त्यावर आई माता मंदिराजवळील मंडपाच्या साहित्याच्या गोदामाला आग लागल्याचे घटना घडली होती. या आगीमुळे जवळपासची एकुण वीस गोदामे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती. गेल्या सव्वातीन ते साडेतीन तासांपासून आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून प्रयत्न केले जात होते. चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यात यश आले होते.