महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ जुलै । राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करत २ जुलै रोजी शिंदे फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या इतर आठ आमदारांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान यानंतर शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षात खातेवाटपावरून बराच काळ चर्चा सुरू होत्या. अखेर शुक्रवारी मंत्रिमंडळाचे खातेवाटप पार पडले. अजित पवारांनी अर्थखातं सोपवण्यात आलं आहे. यानंतर शिंदे गटातील नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.
मंत्रिमंडळ खातेवाटपाच्या चर्चांदरम्यान शिवसेना आमदारांचा अजित पवारांना अर्थखातं देण्याला विरोध होता अशा चर्चा सुरू होत्या. मात्र शेवटी अर्थखातं अजित पवारांना मिळाल यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसला इतरही काही महत्वाची खाती मिळीली, दरम्यान शिंदे गटातील नेते शंभुराज देसाई यांनी शिवसेनेत कोणीही नाराज नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
आमच्यात कोणीही नाराज नाही. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ५० आमदार आमचे सर्व अधिकार हे आमचे नेते एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे सगळ्यांना समावून घेऊन, समतोल राखून कोणीही नाराज राहणार नाहीत अशीच मंत्रिमंडळ विस्ताराच्या बाबतीत भूमिका घेतील असेही शंभूराज देसाई म्हणाले.
कोणाला कोणतं खातं मिळालं?
काल झालेल्या खातेवटपामध्ये अजित पवार यांना अर्थ खातं देण्यात आलेलं आहे. धनंजय मुंडे यांच्याकडे कृषी खातं, दिलीप वळसे पाटील- सहकार, हसन मुश्रीफ- वैद्यकीय शिक्षण, छगन भुजबळ- अन्न व नागरी पुरवठा, धर्मराव आत्राम- अन्न आणि औषध प्रशासन, अनिल भाईदास पाटील- मदत आणि पुनर्वसन, संजय बनसोडे यांच्याकडे क्रीडा तर अदिती तटकरे यांच्याकडे महिला आणि बालकल्याण खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.