‘या’ कारणामुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला; बच्चू कडू यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ जुलै । शिंदे सरकार सत्तेत येऊन आता वर्ष पूर्ण झालं आहे. तरीही भाजप-शिवसेनेचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यावर शिंदेगटातील नेत्यांनी अनेकदा भाष्य केलं आहे. मंत्रिमंडळ विस्तार लवकर व्हावा, अशी इच्छाही व्यक्त केली आहे. मात्र आज-उद्या करता करता वर्ष सरलं तरी मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यावर आमदार बच्चू कडू यांनी अनेकदा उघड भाष्य केलं आहे. आताही त्यांनी मंत्रिमंडळ विस्तार का लांबला त्यावर भाष्य केलंय.


न्यायालयाचा निकाल, अध्यक्षांचा निकाल यामुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडला असं वाटत होतं. मात्र आता समजलं की राष्ट्रवादीमुळेच मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. काँग्रेस हा एक पक्षच आता युतीमध्ये येणं बाकी आहे. तोही आला तर काय हरकत आहे?, असं बच्चू कडू म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

अजितदादा मुख्यमंत्री होतील याला मी हो ही म्हणू शकत नाही आणि नाही सुद्धा म्हणू शकत नाही. राज्याचं राजकारण सध्या अंदाजाच्या पलीकडे गेलं आहे, अशी मिश्किल टिप्पणीही बच्चू कडू यांनी केली आहे.

आता जे आहे ते शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून सामोरं जायचं आहे. गाडी घोडा बंगला असूनही आता राजकीय नेते अस्थिर आहेत. मागून आलेल्या राष्ट्रवादीला झुकत माप दिलं जातंय. आमच्या नशिबी काय येतंय पाहू, असं म्हणत बच्चू कडू यांनी आपण वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचं म्हटलं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *