पुणे पालकमंत्रीपदासाठी अजितदादा ? ; भाजपला बसणार धक्का

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ जुलै । राज्यातील राजकारणात मोठे बदल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसपासून अजित पवार यांनी आपला वेगळा गट तयार केला. त्यांनी २ जुलै रोजी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत नऊ जण मंत्री झाले. यानंतर बुधवारी अजित पवार यांना हवे असलेले अर्थ अन् नियोजन खातेही मिळाले. शिवसेनेचा दबाव झुगारुन अजित पवार अर्थमंत्री झाले. आता त्यांनाच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळणे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे पुणे भाजपसाठी हा धक्का आहे.


अजित पवार यांना का हवे पुणे
अजित पवार आणि शरद पवार दोन्ही नेते पुणे जिल्ह्यातील आहेत. शरद पवार गटातून अजित पवार वेगळे झाले आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात शरद पवार यांच्यापेक्षा आपला गट मजबूत करण्यासाठी त्यांना पालकमंत्रीपद हवे आहे. अजित पवार यांचे सर्वाधिक लक्ष पुण्याकडे असते. विरोधात असताना ते पुण्यात सतत बैठका घेत होते. पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यात होऊ शकतात. त्यावेळी आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी त्यांना पालकमंत्रीपद हवे आहे. पालकमंत्री पद ज्याच्याकडे असेल त्या पक्षांची अनेक कामे होत असतात. यामुळे अर्थ खात्यानंतर पुणे जिल्ह्यातील पालकमंत्रीपदासाठी अजितदादांची दादागिरी चालणार आहे, हे जवळपास निश्चित झाले आहे.

भाजपला बसणार धक्का
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे गेल्यास स्थानिक भाजपला तो धक्का बसणार आहे. स्थानिक भाजप कार्यकर्ते अजित पवार यांना पालकमंत्री करण्यास विरोध करत आहेत. कारण पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी अन् भाजप दोन्ही पक्ष प्रभावी आहेत. परंतु भाजप आमदार आणि नगरसेवकांची संख्या पुण्यात राष्ट्रवादीपेक्षा जास्त आहे. यामुळे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भाजपकडे ठेवावे, असा आग्रह स्थानिक कार्यकर्त्यांचा आहे. भाजपकडून राष्ट्रवादीकडे हे पद गेल्यास भाजप बॅकफूटवर जाईल, अशी भीती कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *