महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ जुलै । आजकाल हेडफोनचा वापर बहुतांश लोक करतात. जगापासून, आजूबाजूच्या गर्दीपासून स्वतःला वेगळं करण्यासाठी हेडफोन भरपूर फायद्याचे ठरतात. त्यामुळेच गाणी ऐकण्यासाठी किंवा कॉलिंगसाठीही लोक हेडफोनला प्राधान्य देतात.
तुम्हीदेखील हेडफोनचा वापर करत असाल, तर तुम्हाला माहिती असेल की हेडफोनच्या दोन्ही स्पीकरवर ‘L’ आणि ‘R’ ही अक्षरं लिहिलेली असतात. L लिहिलेली बाजू ही लेफ्ट म्हणजेच डाव्या कानासाठी असते, तर आर लिहिलेली बाजू राईट म्हणजेच उजव्या कानासाठी असते.
काही हेडफोनच्या स्पीकर्सचा आकार अशा प्रकारचा असतो, की त्याची ठरलेली बाजू ठरलेल्या कानातच बसते. मात्र, कित्येक हेडफोन्सचे दोन्ही बाजूचे स्पीकर हे गोलाकार असतात. मग अशा वेळी कोणत्या कानात कोणता स्पीकर आहे याने फरक पडतो का? तर हो!
स्टीरियो रेकॉर्डिंग
एखादं गाणं रेकॉर्ड करताना कित्येक वेळा स्टीरियो रेकॉर्डिंगचा वापर करण्यात येतो. यामध्ये डाव्या बाजूला येणारे आवाज आणि उजव्या बाजूला येणारे आवाज हे वेगवेगळे असतात. कित्येक गाण्यांमध्ये उच्च स्वर असणाऱ्या वाद्यांचा आवाज आणि कमी स्वर असणाऱ्या वाद्यांचा आवाज वेगवेगळ्या चॅनलमधून (डाव्या किंवा उजव्या) देण्यात येतो. यामुळे यूजरला अधिक चांगला अनुभव येतो.
चित्रपटांमध्ये वापर
चित्रपटांमध्ये या पद्धतीने रेकॉर्डिंगचा वापर करण्यात येतो. तुम्ही लॅपटॉपवर हेडफोन लावून एखादा चित्रपट पाहत असाल; आणि त्यात स्टीरियो रेकॉर्डिंग केलं असेल, तर तुम्हाला हे लगेच लक्षात येईल. यामध्ये स्क्रीनवर दिसणारी व्यक्ती किंवा एखादे वाहन ज्या बाजूला असेल, त्या बाजूच्या हेडफोनमधून त्याचा आवाज येतो.
तीच व्यक्ती वा गाडी डावीकडून चालत उजवीकडे गेली, तर तुम्हाला येणारा आवाजही या कानातून त्या कानात जात असल्याचं जाणवतं. चित्रपट पाहणाऱ्या व्यक्तीला आपण खरोखर त्या ठिकाणी असल्याची अनुभूती व्हावी यासाठी असं केलं जातं.यामुळेच पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही गाणी ऐकण्यासाठी, वा चित्रपट पाहण्यासाठी हेडफोन वापराल; तेव्हा त्याची लेफ्ट आणि राईट बाजू नक्कीच पाहून घ्या.