महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ जुलै । मराठीतील पहिले चॉकलेट हीरो म्हणून ख्याती मिळवलेले दिग्गज अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत तळेगाव दाभाडे परिसरातील आंबी येथील एका बंद फ्लॅटमध्ये शुक्रवारी आढळला. मंगळवारी त्यांनी ‘बाळा तू कुठे होतीस’ अशी मोलकरणीची आस्थेवाईकपणे विचारपूस केली होती. त्यानंतर शुक्रवारी त्यांचा मृतदेह आढळला.
दरम्यान, शनिवारी पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी, बुधवारी त्यांचा मृत्यू झाल्याने घरातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती. पाेलिसांनी फ्लॅटचा दरवाजा ताेडून आत पाहिले असता हाॅलमध्ये कुजलेल्या अवस्थेतील महाजनींच्या मृतदेहाच्या शरीरातून रक्त बाहेर पडत होते.
रवींद्र महाजनी यांची पत्नी आजारी असल्याने त्या मुंबईतील घरी असतात, तर मुलगा अभिनेता गश्मीर हा कामामुळे मुंबईतच राहताे. साेसायटीतील इतर कुटुंबीयांशी रवींद्र महाजनी यांचा फारसा परिचय नव्हता. तसेच त्यांच्या घरीदेखील फारशी ये-जा हाेत नसल्याची माहिती साेसायटीतील शेजाऱ्यांनी दिली. साेसायटीत कचरा सफाईसाठी येणाऱ्या महिलेस मंगळवारी ते भेटले हाेते.
त्या वेळी त्यांनी तिला ‘तू कामावर एक दिवस का आली नाहीस, बाळा, तू कुठे हाेतीस?’ अशी विचारणादेखील केली हाेती. त्यानंतर दाेन दिवस त्यांच्या फ्लॅटचा दरवाजा उघडला गेला नव्हता. त्यामुळे सफाई कामगार महिलेसदेखील संशय आल्याने तिने घराचा दरवाजा वाजवला हाेता, परंतु तिला प्रतिसाद मिळाला नाही. शुक्रवार दुपारपासून संबंधित घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने स्थानिकांनी याबाबतची माहिती साेसायटीच्या सुरक्षा रक्षकांना दिल्यावर त्यांनी याबाबत तळेगाव एमआयडीसी पाेलिसांना माहिती दिली.
पाेलिसांनी घटनास्थळी दाखल हाेत दरवाजा ताेडला. त्या वेळी घरात हाॅलमध्ये कुजलेल्या अवस्थेत महाजनी यांचा मृतदेह आढळला. त्यानंतर पाेलिसांनी याबाबतची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना सांगितली. साेसायटीतील लाेकांना माेठा ज्येष्ठ अभिनेता साेसायटीत राहत हाेता, याची माहिती समजली. महाजनी यांच्या निधनामागील नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट हाेईल, अशी माहिती पाेलिस निरीक्षक रणजित सावंत यांनी दिली
८ महिन्यांपासून एकाकी
महाजनी यांना दम्याचा त्रास असल्याने चांगल्या वातावरणासाठी ते मागील आठ महिन्यांपासून आंबी येथील एक्झेबेरिया या साेसायटीत तिसऱ्या मजल्यावर फ्लॅट क्रमांक ३११ मध्ये एकटेच राहत हाेते. पायाला दुखापत झाल्याने त्यांना नीट चालता येत नव्हते. त्यामुळे बहुंताश वेळ ते घरीच राहायचे.