महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ जुलै । उद्यापासून राज्याचे पावसाळी अधिवेशन होत आहे. आधी शिवसेना नंतर राज्याचे विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार यांनाच सत्तेत सहभागी करून घेतल्यामुळे यंदाचे अधिवेशनाचे चित्र वेगळे असणार आहे. कालपर्यंत विरोधी बाकांवर बसणारे राष्ट्रवादीचे अनेक ज्येष्ठ नेते उद्या सत्ताधारी बाकांवर बसलेले दिसतील. यामुळे विधानसभेत विरोधकांची ताकद कमी झाली आहे. तरीदेखील राज्यासमोर असलेल्या अनेक गंभीर समस्यांमुळे विरोधकांपुढे आक्रमक होण्याची चांगली संधी असणार आहे.
शिंदे गट मागच्या रांगेत
विधिमंडळ सभागृहात मंत्र्यांच्या ज्येष्ठतेनुसार आसन व्यवस्था केली जाते. शिंदे गट व भाजपच्या मंत्र्यांपेक्षा राष्ट्रवादीचे मंत्री ज्येष्ठ आहेत. त्यामुळे ज्येष्ठतेनुसार छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना पहिल्या रांगेत बसण्याचा मान मिळेल. त्यामुळे सध्या पहिल्या रांगेत बसत असलेल्या शिंदे गट व भाजपच्या मंत्र्यांना दुसऱ्या, तिसऱ्या रांगेत ढकलले जाणार आहे.
विरोधी पक्षनेता कोण?
अजित पवार सत्ताधारी पक्षात गेल्याने विधानसभेत विरोधी पक्षनेते पद रिकामे आहे. त्यामुळे आमदारांच्या संख्याबळानुसार काँग्रेस विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार आहेत. मात्र, नेता कोण असणार? याबाबत अजूनही संभ्रम आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकतीच दिल्लीवारी केली. आक्रमकपणे भूमिका मांडणाऱ्याला विरोधी पक्षनेता करावा, असा सूर ठाकरे गट व राष्ट्रवादीतून काढला जात आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेस विरोधी पक्षनेता म्हणून कोणाला निवडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
विरोधी बाकांवर हे नेते बसतील
विधानसभेत विरोधी बाकांवर भास्कर जाधव, सुनील प्रभू, रवींद्र वायकर, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण असे दिग्गज नेते, तर विधान परिषदेत उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विलास पोतनीस सचिन अहिर, शेकापचे जयंत पाटील, बंटी पाटील, भाई जगताप, एकनाथ खडसे, शशिकांत शिंदे अशी विरोधकांची फळी आहे. विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त बारा जागा रिक्त असल्यामुळे या सभागृहात विरोधकांचे बहुमत आहे.
मविआची रणनीती
जुलैचे पंधरा दिवस लोटले तरी महाराष्ट्रातील अनेक भागांत अजूनही पाऊस नाही, धरणे कोरडीठाक पडली असून पेरण्या रखडल्या आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. महिला अत्याचाराचे वाढते प्रकार, वाढलेले जातीय तणाव, महागाई, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्याने खोळंबलेली विकासकामे या मुद्यांवर सरकारला घेरण्याची रणनीती महाविकास आघाडीने आखली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेस या महाविकास आघाडीच्या पक्षांची एकजूट शिंदे, फडणवीस व अजितदादांना कसे घेरणार याकडे लक्ष असणार आहे.
दोन उपमुख्यमंत्र्यांसाठी आसन व्यवस्था
अजित पवार सत्तेत गेल्याने राज्यात प्रथमच दोन उपमुख्यमंत्री पदे निर्माण झालेली आहेत. त्यामुळे या अधिवेशनात दोन उपमुख्यंत्र्यांसाठी दोन आसने निर्माण करावी लागतील. उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा ज्येष्ठ आहेत, पण देवेंद्र फडणवीस हे माजी मुख्यमंत्री असल्याने त्यांची आसन व्यवस्था मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शेजारी असणार आहे.
विरोधक या मुद्द्यांवर सरकारला घेरणार
लांबलेला पाऊस, दुबार पेरणीचे संकट, बोगस बियाणे, शेतकऱयांना मिळणारी अपुरी मदत
कोयता गँगची वाढती दहशत, महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना
महसूल व शिक्षकांच्या बदल्यांमधील भ्रष्टाचार, मंत्री अब्दुल सत्तार, संजय राठोड यांचे घोटाळे
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे गेलेल्या बळींबाबत चौकशीत चालढकल
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील वाढते अपघात
राज्यातील वाढती बेकारी आणि राज्याबाहेर जाणारे उद्योग