आगामी काही दिवस राज्यात चांगला पाऊस; कोकण व मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्‍यता

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ जुलै । बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वार्‍याची चक्रीय स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे राज्यात आगामी पाच दिवस पाऊस वाढणार आहे. तसेच कोकण व मध्य महाराष्ट्रात 18 व 19 रोजी अतिवृष्टीची शक्यता आहे, असा अंदाज पुणे हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी व्यक्त केला आहे.

शनिवारी पृथ्वी विज्ञानमंत्री किरेन रिजिजू यांनी पुणे शहरातील हवामान विभागाच्या पाषाण येथील कार्यालयाला भेट देत आढावा घेतला. त्यावेळी डॉ. होसाळीकर त्यांच्या समवेत उपस्थित होते. महाराष्ट्रात पाऊस का कमी पडत आहे? जुलैची सरासरी पूर्ण होईल की नाही? या प्रश्नांची उत्तरे डॉ. होसाळीकर यांनी दिली. ते म्हणाले, बिपरजॉय चक्रीवादळाचा महाराष्ट्राला फटका बसला. त्यामुळे कमी पाऊस आहे. मात्र, आगामी पाच दिवसांत राज्यात चांगला पाऊस पडेल, असा अंदाज त्यांनी दिला.

कमी पावसामागचे कारण

डॉ. होसाळीकर यांनी सांगितले की, राज्यात कमी पाऊस पडण्याची अनेक कारणे आहेत. बिपरजॉय चक्रीवादळ आले त्यामुळे तो लांबला. मान्सूनची पहिली शाखा कमकुवत झाल्याने तेथे दुसरा फटका बसला, तर पुढे वेगाने बंगालच्या उपसागरातून सक्रिय झालेली दुसरी शाखा कमकुवत झाली, त्यामुळे राज्यात पाऊस घटला.

17 पासून पाऊस वाढणार
राज्यात 17 जुलैपासून पाऊस वाढणार असून, 22 जुलैपर्यंत तो जोरदार बरसेल. यात प्रमुख्याने कोकण व मध्य महाराष्ट्रात जोर राहील. 18 व 19 रोजी या दोन्ही भागांत अतिवृष्टी होऊ शकते. मात्र, मराठवाडा, विदर्भात त्या तुलनेत कमी पाऊस राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *