महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ जुलै । चांदणी चौकात सुरू असलेल्या कामामुळे (Chandani Chawk) मुंबई-बंगळुरू महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांसाठी वाहतूक विभागाने जारी केलेल्या वाहतूक वळणाची मुदत आणखी सहा दिवसांसाठी वाढवण्यात आली आहे. वाहतूक विभागाने सांगितल्याप्रमाणे केलेल्या 21 जुलैपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
माहितीनुसार, काम सुरु असल्यामुळे वाहतूक वळवण्यात आली आहे. 15 जुलै ते 21 जुलै दरम्यान साडे बारा (मध्यरात्री) ते 03:30 (सकाळी) दरम्यान वाहतूक वळवण्यात आली आहे. यापूर्वी 15 जुलैपर्यंत वाहतूक वळवण्यात आली होती. गर्डर टाकण्याचं काम 15 जुलैपर्यंत होणं अपेक्षित होतं मात्र ते काम अजूनही पूर्ण झालं नाही त्यामुळे 21 जुलैपर्यंत वाहतूकीत बदल करण्यात आला आहे.
वाहतुकीत बदल कसे असेल?
1. मुंबईकडून येणारी अवजड वाहने मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील तळोजा टोल प्लाझा आणि जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील सोमाटणे टोल प्लाझा येथे थांबतील.
2. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून येणारी हलकी वाहने भुजबळ चौक-राजीव गांधी ब्रिज रोड, आणि चांदणी चौक दिवा हॉटेल मार्गे कात्रजला जातील.
3. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक व्यवस्थापनासाठी अवजड वाहनांना भुजबळ चौक – किवळे पूल आणि राया चौक दरम्यानचा राजीव गांधी पूल रस्ता वापरण्याचे निर्देश दिले जातील.
‘लवकरात लवकर कामं पूर्ण करा’
दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी चांदणी चौकातील उड्डाणपूल प्रकल्पाच्या कामास भेट देऊन पाहणी केली. उड्डाणपूल प्रकल्पाचे उर्वरित काम गतीने पूर्ण करावे आणि उद्घाटन कार्यक्रमाचे योग्य नियोजन करावे, अशा सूचना दिल्या.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पुण्यातील चांदणी चौकात उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुला प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या 12 ऑगस्ट रोजी केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्याचे नियोजित आहे. या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने चंद्रकांत पाटलांनी पाहणी केली आहे.
पुण्यातील चांदणी चौकातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून चांदणी चौकात उड्डाणपूल, सेवा रस्ता उभारण्यात येत असून, सध्या या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच सर्व काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती प्रकल्प संचालकांनी सांगितलं आहे.
महत्वाचा रस्ता…
पुणेकरांसाठी चांदणी चौक हा अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे त्याचे उर्वरित काम जलदगतीने पूर्ण करावे. त्यासोबतच कामात कोणतीही त्रुटी राहू नये, याची खबरदारी घ्यावी. पावसाची शक्यता लक्षात घेऊन, उद्घाटन कार्यक्रमाचे नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या पाहणीच्या वेळी दिल्या आहेत.