महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ जुलै । महाराष्ट्राच्या राजकारणात 2 जुलै रोजी महाभूकंप झाला. अजित पवार यांनी बंड करत भाजपची कास धरली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वरच्या फळीत सामील होणारे अजित पवार उपमुख्यमंत्री पदी विराजमान होऊन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. त्यामुळे आता राज्यात दोन उपमुख्यमंत्री झाले. राज्याचा गाडा आता शिंदे-फडणवीस-पवार सरकार हाकणार आहे.
वर्षभरापूर्वी स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरणारे राष्ट्रवादीचे नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार आता सत्ताधाऱ्यांच्या पंक्तीत जाऊन बसले. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे सुमारे 38 ते 40 आमदारांचे समर्थन आहे. तर त्यांच्या गटातील अन्य आठ मंत्री देखील आहे.
महाराष्ट्रात राजकीय भूकंपानंतर मंत्रीमंडळ विस्तार देखील झाला. आणि आता विरोधकच सत्ताधारी झाल्याने उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशात विधीमंडळात चित्र वेगळेच पाहायला मिळणार आहे. चला तर जाणून घेऊया, अधिवेशन काळातील विधीमंडळात कशी असेल स्थिती….!
विरोधी पक्षांची परिस्थिती काय?
विरोधी पक्षाबाबत बोलायचं झाले तर, महाराष्ट्रात काँग्रेसचे 44 आमदार आहेत. तर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 15 आमदार आहेत. राष्ट्रवादी (शरद पवार गट) 19, समाजवादी पार्टी 2 आमदार, भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा एक, स्वाभिमानी पक्षाचा एक आणि पीजेंट्स एंड वर्कर्स पार्टी ऑफ इंडियाचा एक आमदार आहे. यासोबतच एक अपक्ष आमदार विरोधी पक्षात आहे. तर एमआयएमचे 2 आमदार तटस्थ आहेत.
तरी देखील विरोधकांना चांगली संधी
उद्यापासून राज्याचे पावसाळी अधिवेशन होत आहे. आधी शिवसेना नंतर राज्याचे विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार यांनाच सत्तेत सहभागी करून घेतल्यामुळे यंदाचे अधिवेशनाचे चित्र वेगळे असणार आहे. कालपर्यंत विरोधी बाकांवर बसणारे राष्ट्रवादीचे अनेक ज्येष्ठ नेते उद्या सत्ताधारी बाकांवर बसलेले दिसतील. यामुळे विधानसभेत विरोधकांची ताकद कमी झाली आहे. तरीदेखील राज्यासमोर असलेल्या अनेक गंभीर समस्यांमुळे विरोधकांपुढे आक्रमक होण्याची चांगली संधी असणार आहे.
विधानसभेतील एकूण गणित असे
महाराष्ट्राच्या विधानसभेत एकूण 288 सदस्य आहेत. यामध्ये कोणत्याही पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी 145 आमदारांची गरज आहे. जागांच्या संख्येबद्दल बोलायचं झालं तर भाजपचे 106 आमदार आहेत. तर गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करून 40 आमदारांसह ठाकरेंपासून फारकत घेतली होती. त्यांनी भाजपसोबत युती करून सरकार स्थापन केलं आणि मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आता शिंदे गटाच्या एकूण 40 आमदारांचा सरकारला पाठिंबा आहे. तसेच, राज्यात राष्ट्रवादीचे 53 आमदार आहेत. आता अजित पवारांसह सुमारे 40 आमदारांनी सरकारला पाठिंबा दिल्याचा दावा केला जात आहे. यासोबतच इतर 21 आमदारांचाही सरकारला पाठिंबा आहे. त्यात 12 अपक्ष आमदार देखील आहेत.
अजित पवारांसोबत यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
राष्ट्रवादीचे 40 आमदार आपल्यासोबत असल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे. मात्र, अजित पवारांव्यतिरिक्त राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यात धर्माराव आत्राम, सुनील वलसाडे, आदिती तटकरे, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, अनिल पाटील, दिलीप वळसे पाटील यांचा समावेश आहे.
शिंदे गटातील आमदार मागील रांगेत
विधिमंडळ सभागृहात मंत्र्यांच्या ज्येष्ठतेनुसार आसन व्यवस्था केली जाते. शिंदे गट व भाजपच्या मंत्र्यांपेक्षा राष्ट्रवादीचे मंत्री ज्येष्ठ आहेत. त्यामुळे ज्येष्ठतेनुसार छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना पहिल्या रांगेत बसण्याचा मान मिळेल. त्यामुळे सध्या पहिल्या रांगेत बसत असलेल्या शिंदे गट व भाजपच्या मंत्र्यांना दुसऱ्या किंवा तिसऱ्या रांगेत ढकलले जाणार आहे.
विरोधी पक्षनेता कोण? आज ठरणार
अजित पवार सत्ताधारी पक्षात गेल्याने विधानसभेत विरोधी पक्षनेते पद रिकामे आहे. त्यामुळे आमदारांच्या संख्याबळानुसार काँग्रेस विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार आहेत. मात्र, नेता कोण असणार? याबाबत अजूनही संभ्रम आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकतीच दिल्लीवारी केली. आक्रमकपणे भूमिका मांडणाऱ्याला विरोधी पक्षनेता करावा, असा सूर ठाकरे गट व राष्ट्रवादीतून काढला जात आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेस विरोधी पक्षनेता म्हणून कोणाला निवडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
विरोधी बाकांवर असतील हे नेते
विधानसभेत विरोधी बाकांवर भास्कर जाधव, सुनील प्रभू, रवींद्र वायकर, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण असे दिग्गज नेते, तर विधान परिषदेत उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विलास पोतनीस सचिन अहिर, शेकापचे जयंत पाटील, बंटी पाटील, भाई जगताप, एकनाथ खडसे, शशिकांत शिंदे अशी विरोधकांची फळी आहे. विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त बारा जागा रिक्त असल्यामुळे या सभागृहात विरोधकांचे बहुमत आहे.