महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ जुलै । महाराष्ट्रात पाऊस धुंवाधार बरसत असतानाच आता देशभरातही पावसानं दमदार हजेरी लावण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे. तिथं उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये थैमान घालणाऱ्या पावसाचे थेट परिणाम आता जम्मू काश्मीरपपर्यंत दिसून येत आहेत. जिथं वैष्णो देवी मंदिर मार्ग ठप्प झाल्याची माहिती समोर आली आहे.
मंगळवारी रात्री उशिरापासून सुरु असणाऱ्या अतिमुसळधार पावसामुळं कटरा मार्ग वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. शिवाय मंदिराच्या दिशेनं येणाऱ्या इतर वाटांवरील वाहतुकही ठप्प झाली आहे. अनेक ठिकाणी पावसामुळं भूस्खलनाच्याही घटना घडल्यामुळं संभाव्य धोका आणि यात्रेकरुंची सुरक्षितता पाहता यात्रामार्ग काही काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. सध्या बचाव पथकं आणि संबंधित यंत्रणा मंदिराच्या दिशेनं जाणाऱ्या वाटेवरील दरड हटवण्याचं काम हाती घेताना दिसत आहेत.
एकिकडे वैष्णो देवी मंदिराकडे जाणारा नवा (हिमलोटी मार्ग) मार्ग बंद केलेला असताना दुसरीकडे रियासी जिल्ह्यातून मंदिराच्या दिशेनं निघणारी हेलिकॉप्टर सेवाही निलंबित करण्यात आली आहे.