महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ जुलै । पावसाळ्यात दरवर्षी उलट्या, जुलाब, गॅस्ट्रोचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात. दूषित अन्न व पाण्याच्या सेवनामुळे या आजारांना सुरुवात होते. यात पूरग्रस्त भाग मोठ्या प्रमाणात जीवाणूंचे (Bacteria) प्रजनन केंद्र बनतात. त्यामुळे अनेकांना विविध साथींच्या आजारांची लागण होते. या परिस्थितीत आतड्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यात पावसाळ्यात जठरासंबंधीच्या सर्व आजारांवर वेळेवर उपचार न केल्यास परिस्थिती आणखी गंभीर होते.
इ-कोइल, साल्मोनेला एन्टरिका, रोटाव्हायरस यांसारखे विषाणूजन्य आजार दूषित पाण्यामुळे पसरतात. त्यात मासे, कोंबडी आणि आपण खात असलेल्या प्राण्यांमार्फत ते आपल्यापर्यंत पोहचतात. त्यामुळे पावसाळ्यात रुग्णालयांमध्ये अतिसार, उलट्या, ताप किंवा अन्नातून विषबाधा यांसारख्या संसर्गबाधेमुळे पोट बिघडलेल्या रुग्णांची संख्या अचानक वाढत आहे. कारण- पावसाने आलेल्या पुरामुळे पाणी दूषित होते आणि तेच पाणी आपण वापरत असल्याने त्यातील अनेक विषारी द्रव्ये आपल्यापर्यंत पोहोचण्याचा धोका असतो. त्यात घरी तयार केलेल्या अन्नपदार्थांपेक्षा बाहेरचे अन्नपदार्थ फार अस्वच्छ असतात, अशी माहिती गुरुग्राममधील सी. के. बिर्ला हॉस्पिटलमधील लीड कन्सल्टंट, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी डॉ. अनुकल्प प्रकाश यांनी दिली आहे.
पावसाळ्यात होणारे पोटाचे विकार
१. डायरिया आणि डिसेंट्री : दूषित पाणी आणि अन्नामुळे होणाऱ्या या आजारांत जुलाब, पोटदुखी, अंगदुखी, मळमळ होऊ शकते. यावेळी योग्य औषधे आणि इलेक्ट्रोलाइट्ससह पुरेसे पाणी प्यायल्यास आराम मिळू शकतो. तसेच तुमच्या शरीराची ऊर्जा पातळी राखण्यात मदत होईल. घरी शिजवलेले, पचायला हलके अन्न तुम्हाला लवकर बरे होण्यास मदत करील.
२. गॅस्ट्रोएन्टेरिटिस : निरोगी लोकांमध्ये सहसा या आजाराची गंभीर लक्षणे दिसत नाहीत. त्यावर पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट सुरेश जैन सांगतात की, जास्त ताप, मलातून रक्त येणे, डिहायड्रेशन, घसा कोरडा पडणे, लघवी कमी होणे, अशक्तपणा व डोके दुखणे यांसारखी लक्षणे दिसत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
३. टायफॉइड : हा एक गंभीर जीवाणूजन्य संसर्गाने होणारा आजार आहे; ज्यावर उपचार न केल्यास जीवावर बेतू शकते. जास्त ताप, पोटदुखी, मळमळ व उलट्या ही टायफॉइडची सामान्य लक्षणे आहेत. या संसर्गावर योग्य त्या औषधोपचारासाठी तुमच्या डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्या.
४. हेपॅटायटिस ए आणि कावीळ : हेपॅटायटिस ए हा आजार विषाणूमुळे होतो; ज्यामुळे यकृताला सूज येते. अस्वच्छता, दूषित पाणी व अन्न यांमुळे यकृताचे कार्य बिघडते. तसेच डोळ्यांचा रंग पिवळा होणे, लघवी पिवळी होणे, पांढरा मल व पोटदुखी हे त्रास होऊ शकतात. ही सर्व काविळीची लक्षणे आहेत. काविळीवर योग्य ते उपचार घेण्यासाठी ताबडतोब आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.