![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० जुलै । Raigad Rain Alert – तीन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे महाड तालुक्यातील काळ, गांधारी व सावित्री नदीला पूर आल्याने महाड व परिसरातील जनजीवन विस्कळित झाले आहे.
सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने शहरात पुराचे पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. महाड नगरपालिका व जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून बचाव पथक सज्ज आहे.
गेल्या २४ तासांत महाड तालुक्यात १९० मिलिमीटर तर पोलादपूर तालुक्यात २२३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वरमध्ये पडणारे पाणी सावित्री नदीमार्गे महाडमध्ये येत असल्याने शहराला पुराचा फटका बसत आहे. रायगड भागातून येणारी काळ व गांधारी या नद्याही मंगळवारपासून दुथडी भरून वाहू लागल्याने महाड शहरांमध्ये बुधवारी सकाळपासून पुराचे पाणी शिरू लागले.
दस्तुरी नाका ते नातेखिंड हा रायगड किल्ल्याकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेला. भीमनगर, दस्तुरी नाका, गांधारी नाका या भागामध्ये गांधारी नदीचे पाणी शिरल्याने नागरिकांनी सुरक्षित स्थळी सामान हलवण्यास सुरुवात केली.
सावित्री नदीतील पाणी भोईघाटामार्गे महाड शहरात शिरू लागले आहे. सावित्रीची पातळी दुपारी दोन वाजेपर्यंत साडेसात मीटरपर्यंत गेल्याने शहरातील बाजारपेठेत पाणी शिरण्यास सुरुवात झाली होती. महाड शहरातील सुकट गल्लीत आधी पाणी शिरल्यानंतर महात्मा गांधी मार्गावर, बाजारपेठेत पाणी शिरण्यास सुरुवात झाली.
२०२१ मध्ये पुराचे पाणी शिरल्याने महाडकारांचे अतोनात नुकसान झाले होते. आता पुन्हा शहरात पाणी शिरू लागल्याने महाडकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील डोंगरेपूल, भाजी मंडई परिसरात पाणी भरले. त्यामुळे बुधवारी सकाळपासूनच सामान सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी व्यापाऱ्यांची धावपळ सुरू होती.
नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यासाठी महाड नगरपालिकेकडून भोंगे वाजवून पाण्याच्या पातळीचा इशारा दिला जात होता. नगरपालिकेकडून बचाव कार्य व बचाव गट स्थापन करण्यात आले असून संबंधित अधिकाऱ्यांचे फोन क्रमांक व्हाॅट्सअॅपद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येत आहेत.
आंबेनळी घाटात दरड कोसळली
पोलादपूर सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले. तालुक्यातील माटवन-सवाद या विभागातील घरांमध्ये पुराचे पाणी शिरले. गोपाळवाडी गावात रस्त्यावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. गांधारी पूल, दस्तुरी नाका भागात पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली होती.
अनेकांनी आपली वाहने गोवा महामार्गालगत उभी केल्याने सुमारे पाच किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. पाणी साचलेल्या ठिकाणी, पुलावर फलक सूचना फलक लावून मार्ग बंद करण्यात आले आहेत.
आंबेनळ घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. शहराप्रमाणेच तालुक्यातील ग्रामीण भागातही पावसाचा जोर कायम आहे. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी महाडमध्ये एनडीआरएफचे पथक तैनात आहे. आवश्यकता वाटल्यास सुरक्षित स्थळी नागरिकांचे स्थलांतर केले जाणार आहे.
नद्या दुथडी भरून
माणगाव संततधार पावसाने माणगाव तालुक्याला झोडपले असून सर्व नद्या, ओढे या दुथडी भरून वाहत आहेत. महामार्गालगतची काळ नदीचे पाणी पुलाच्या कठड्याला लागल्याने याठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले आहेत. कळमजे गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद आहे. दिवसभरात १२९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
रेवदंडा बाजारपेठेत शुकशुकाट
रेवदंडा वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या पावसामुळे अनेकांनी घराबाहेर न पडणे पसंत केले. त्यामुळे भाजी बाजार, फळ बाजारात ग्राहकांची संख्या रोडवली होती. शाळांना सुटी जाहीर केल्याने स्कूल बस, व्हॅन, रिक्षांची वर्दळ बंद होती. तर काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला होता. परिसरातील नद्या- नाले दुथडी भरून आहेत.