इरशाळवाडीत बचावकार्याला सुरुवात, अजूनही 100 हून अधिक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ जुलै । रायगड जिल्ह्यातील इरशाळवाडीवर दरड कोसळून 25 घरे ढिगाऱ्याखाली दबली गेली आहेत. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 16 ग्रामस्थांचे मृतदेह सापडले आहेत. तर, 98 जणांना वाचवण्यात यश आले आहे. गुरुवारी (ता. 20) संध्याकाळी पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत होते. त्यामुळे बचावकार्य थांबवण्यात आले होतं. आज सकाळी 6.30 वाजता हे बचावकार्य पुन्हा सुरु करण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळीच विधान भवनात पोहोचले आणि त्यांनी रायगड जिल्ह्यात झालेल्या दुर्घटने संदर्भात आढावा घेतला. सकाळीचे रायगड जिल्ह्यात इरशाळवाडी येथे प्रशासनाच्या वतीने मदत कार्य सुरू झाले आहे. या मदत कार्यात येणाऱ्या अडथळे आणि पुढील उपाययोजना या संदर्भात त्यांनी महत्त्वाच्या सूचना देखील केल्या.

खालापूरजवळील दुर्गम इरशाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या इरशाळवाडी या छोट्याशा वस्तीवर बुधवारी रात्रीदरड कोसळली. या वाडीतील 48 पैकी 40 घरांवर ही दरड कोसळली. त्यात गाढ झोपेत असलेले 200 हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले. एनडीआरएफ टीम, पोलिस, नवी मुंबई महापालिका, पनवेल महापालिका यांच्या टीम बचावासाठी पहाटे पहाटे घटनास्थळी पोचल्या. पण घरावर वीस फूट मलबा असल्याने बचावकार्य करता येत नव्हते. एनडीआरएफच्या चार टीमने युद्धपातळीवर प्रयत्न करून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 98 जणांचे प्राण वाचवले. मात्र या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह हाती लागले आहेत, तर अजून 100 लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. गुरुवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू असलेले बचावकार्य नंतर अंधार पडल्याने थांबवावे लागले. आज शुक्रवारी सकाळी 6 वाजेपासून हे बचावकार्य पुन्हा सुरू करण्यात आले.

बचावकार्यात अडथळे
इरशाळवाडी हे समुद्रसपाटीपासून 4 हजार फूट उंचीवर वसलेले दुर्गम गाव आहे. तिथे वाहने जात नाहीत. चौक मानिवली गावातून पायी जावे लागते. यासाठी जवळपास दीड तास लागतो. पाऊस, सर्वत्र दाट धुके यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.

डोंगरावरच दफनविधी
इरशाळवाडीत ठाकर आदिवासी समाजाची 48 कुटुंबे राहतात. तेथील लोकसंख्या 228 आहे. या गावात 17 ते 19 जुलैदरम्यान तब्बल 499 मिमी, तर 19 जुलैला 100 मिमी पाऊस झाला. त्यामुळे डोंगराचा भाग ढासळला. वाडीवर जाण्यासाठी खडी चढण, दोन्ही बाजूंना दरी आणि चिखलाचा निसरडा रस्ता आहे. सांभाळून वरती गेले की पहिल्यांदा वाडीची स्मशानभूमी लागते. मजूर तेथेच अंत्यसंस्कारासाठी खड्डे खोदत असल्याची विदारक स्थिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *