महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ जुलै । अजित पवार गटातील आमदार अमोल मिटकरी यांनी एक सूचक ट्विट केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार हे लवकरच मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील असे ट्विट मिटकरी यांनी केले आहे. यामुळे शिंदे गटातील आमदारांची चिंता वाढली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज 64 वा वाढदिवस आहे. वाढदिवसामुळे अजित पवारांना राज्यभरातील नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा मिळत आहेत. तसेच काही कार्यकर्त्यांनी बॅनरबाजीही केली असून यात अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केला आहे.
मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की……! लवकरच #अजितपर्व pic.twitter.com/12jZ8BMPRi
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) July 21, 2023
आमदार अमोल मिटकरी यांनीही अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे ट्विट केले आहे. एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी रात्री अचानक सहकुटुंब दिल्लीला गेले, तर दुसरीकडे मिटकरी यांनी ‘लवकरच अजितपर्व’ सुरू होणार असल्याचे ट्विट केले आहे. अजित पवारांच्या वाढदिवशीच त्यांनी हे ट्विट केल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.
‘मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की…! लवकरच #अजितपर्व’, असे ट्विट अमोल मिटकरी यांनी केले आहे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर मिटकरी यांनी केलेल्या सूचक ट्विटची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. मात्र या ट्विटमुळे शिंदे गटाच्या आमदारांची चिंता वाढली आहे. आधी अर्थमंत्रीपद अजित पवारांकडे नको म्हणून अडून बसलेले आमदारांची आता मुख्यमंत्री पदही त्यांच्याकडेच गेल्यास कुचंबणा होणार आहे.