Maharashtra Weather Alert : वीकेंडला घरीच थांबा; पुण्यासह या शहरांना अतिवृष्टीचा अलर्ट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ जुलै । गेल्या आठवड्याभरापासून राज्यात तुफान पाऊस झाला. यामुळे सर्वत्र पाणी साचलं असून मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं. अशात आता वीकेंड आला असून अनेकजण फिरण्यासाठी बाहेर पडतात. पण हवामान खात्याकडून सगळ्यांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण, राज्यात सर्वत्र सुरू असलेल्या पावसाचा जोर पुढचे दोन दिवस कायम असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पावसाचा अंदाज घेत घराबाहेर पडावं अशा सूचना देण्यात आल्या आहेत.


हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात कोकणासह संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर मान्सून सक्रिय आहे. यामुळे मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, पालघर आणि घाट भागात आयएमडीकडून अतिवृष्टीचा अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे शक्यतो आठवड्याच्या शेवटी घरीच रहा, अशा सूचना हवामान विभागाकडून देण्यात आल्या आहेत. अशात पुढील तीन ते चार तासांमध्ये मुंबईसह ठाणे, रायगडमध्ये पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आपली काळजी घ्यावी.

दरम्यान, मान्सून महाराष्ट्र राज्यात पुन्हा जोमाने सक्रिय होत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट आणि अगदी विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण आणि पुणे, सातारा, कोल्हापूर आणि नाशिक या भागांतही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या मुंबई शहर आणि मुंबई उपनगरात मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. जोरदार पाऊस झाल्यानं सखल भागांत पाणी साचले असून याचा मोठा परिणाम वाहतुकीवर झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *