पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट ; राज्यात कोणत्या जिल्ह्यांत कोसळणार मुसळधार

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ जुलै । राज्यभरात सुरु असलेला मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. मुंबई, कोकण, विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. हवामान विभागाने रविवारी राज्यातील १४ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी यलो अलर्ट दिला आहे. पुणे परिसरातील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरु आहे. यावेळी पुणे शहरात मात्र पावसाची प्रतिक्षा आहे.

काय आहे पुण्यातील परिस्थिती
पुणे जिल्ह्यात घाटमाथा परिसरात गेल्या दोन दिवसांपासून रेड अलर्ट जारी केला आहे. मात्र शहरात अजून दमदार पाऊस नाहीच. शनिवारी दिवसभरात अवघ्या एक मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत पुण्यात 53 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मात्र घाटमाथा परिसरात पावसाची जोरदार हजेरी आहे. घाटमाथ्यावर रेड अलर्ट दिल्याप्रमाणे जोरदार पाऊस सुरु आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत हळूहळू पाणीसाठा जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

पुणे जिल्हा अलर्ट मोडवर
रायगड जिल्ह्यातील दुर्घटनेनंतर पुणे जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. पुणे जिल्ह्यातील दरडप्रवण गावांची यादी प्रशासनाने जाहीर केली आहे. जिल्ह्यातील 23 संभाव्य गावे दरडप्रवण क्षेत्राच्या यादीत आहेत. मावळ, आंबेगाव, वेल्हा, जून्नर, भोर, खेड, या तालुक्यातील गावांचा समावेश यामध्ये समावेश आहे.

अजून चार दिवस मुसळधार
राज्यात पावसाचा जोर पुढील चार दिवस कायम राहणार आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख के.एस.होसळीकर यांनी यासंदर्भात टि्वट केले आहे. त्यानुसार राज्यात काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट तर काही ठिकाणी यलो अलर्ट दिला आहे.

कोकणात मुसळधार
कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरूच आहे. कोकणात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती आहे. प्रशासनाने पर्यटन स्थळांवर लक्ष केंद्रीत केले आहे. खेडमधील जगबुडी नदीत सातत्याने पाण्याची पातळी वाढत आहे.

विदर्भात सर्वत्र पाऊस
विदर्भ आणि मराठवाड्यात सर्वत्र पाऊस सुरु आहे. वाशिम जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 33 मिमी पाऊस झाला आहे. वाशिममध्ये सर्वाधिक पाऊस कारंजा आणि मानोरा तालुक्यात झाला आहे. कारंजात 50.8 मिमी तर मानोऱ्यात 64.9 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यात सर्वत्र पाऊस होत असल्याने धरणांमधील जलसाठ्यात वाढ झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *