पिंपरी चिंचवड ते पुणे २२ मिनिटात, मेट्रो सेवेचा विस्तार, तिकीटाचे दर किती? वाचा A to Z माहिती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ जुलै । पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील मेट्रो सेवेचा बहुप्रतीक्षित विस्तार अखेर एक ऑगस्टपासून होणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. वनाझ ते रुबी हॉल आणि पिंपरी-चिंचवड ते शिवाजीनगर न्यायालय (सिव्हिल कोर्ट) दरम्यानच्या मेट्रो मार्गांना मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांची (सीएमआरएस) मान्यता मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एक ऑगस्टला उद्घाटन झाल्यानंतर सकाळी सात ते रात्री दहापर्यंत दर १० मिनिटांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांना मेट्रो उपलब्ध होणार आहे.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात वनाझ ते गरवारे कॉलेज आणि पिंपरी-चिंचवड ते फुगेवाडी दरम्यान मेट्रो सेवा कार्यान्वित झाली होती. त्यानंतर मेट्रोच्या विस्तारासाठी पुणेकरांना बरीच प्रतीक्षा करावी लागली. अखेर सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या एक ऑगस्टच्या दौऱ्यात मेट्रोचे विस्तारित मार्ग सुरू होणार आहेत.

सिव्हिल कोर्ट येथील इंटरचेंज स्टेशनमुळे पुणे आणि पिंपरीतील प्रवाशांना फायदा होणार आहे. सकाळी सातपासून दोन्ही मार्गांवर मेट्रो सेवा सुरू होणार असून, ती रात्री १० पर्यंत कार्यान्वित राहील. गर्दीच्या वेळेत दर १० मिनिटांनी प्रवाशांना मेट्रो उपलब्ध होणार आहे. कमी गर्दीच्या वेळेत (दुपारी १२ ते ४) दर १५ मिनिटांना मेट्रो उपलब्ध असेल, अशी माहिती महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे (महामेट्रो) संचालक विनोदकुमार अगरवाल (ऑपरेशन) आणि कार्यकारी संचालक हेमंत सोनावणे यांनी दिली.


पिंपरी ते पुणे २२ मिनिटांत

विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असलेले पुणे आणि औद्योगिक नगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड दरम्यान आता अवघ्या २२ मिनिटांत मेट्रोने प्रवास करणे शक्य होणार आहे. या दोन शहरांतील नागरिकांना येण्या-जाण्यासाठी जुना पुणे-मुंबई हा एकमेव रस्ता असल्याने दररोज वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत होता. मेट्रो सेवेमुळेमुळे हा वेळ अवघ्या २२ मिनिटांवर आला आहे. पिंपरी-चिंचवडमधून मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थी पुण्यात येतात, तर पुण्यातून मोठ्या प्रमाणात कंपन्यांचे कर्मचारी पिंपरीत जातात. त्यामुळे दोन्ही शहरांतील नागरिकांना या सेवेचा फायदा होणार आहे. वनाझ ते रुबी हॉल क्लिनिक अंतर २० ते २२ मिनिटांत पार होणार आहे. पिंपरी ते सिव्हिल कोर्ट दरम्यान २२ ते २५ मिनिटांत प्रवास करता येणार आहे. या दोन्ही मार्गांवर सेवा देण्यासाठी ‘महामेट्रो’कडे सध्या १८ ट्रेन उपलब्ध आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

अशी मिळणार सवलत
पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना तिकीटावर ३० टक्के सवलत.
सर्वसामान्य प्रवाशांना शनिवार-रविवार तिकिटावर ३० टक्के सवलत.
पुढील काही दिवसांत कार्ड कार्यान्वित केले जाणार. त्यावर १० टक्के सवलत.

असे आहेत तिकीट दर

वनाझ ते रुबी हॉल : २५
पिंपरी-चिंचवड ते सिव्हिल कोर्ट : ३०
वनाझ ते पिंपरी-चिंचवड : ३५
रुबी हॉल ते पिंपरी-चिंचवड : ३०
वनाझ ते डेक्कन जिमखाना/संभाजी उद्यान/पीएमसी : २०
वनाझ ते शिवाजीनगर/सिव्हिल कोर्ट/रेल्वे स्टेशन : २५
रुबी हॉल ते शिवाजीनगर : १५
रुबी हॉल ते डेक्कन जिमखाना : २०
पिंपरी-चिंचवड ते पीएमसी/पुणे रेल्वे स्टेशन : ३०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *